आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे गारपिटीबाबतचे अंदाज चुकले; हवामान बदलाचा इशारा फाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेल्या दाेन दिवसांपासून विदर्भ-मराठवाड्यात सुरू असलेल्या गारपिटीचे हवामान खात्याचे अंदाज खरे ठरले असले तरी याबाबत युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, जपान मेटलर्जी एजन्सी, ग्लोबल फोरकास्ट सिस्टिम (अमेरिका), नोव्हा एन्व्हायर्नमेंटल मॉडेलिंग सिस्टिम या अांतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे अंदाज मात्र चुकल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे.   

हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘११ फेब्रुवारीच्या गारपिटीसंदर्भातले सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज चुकले. या अंदाजांमध्ये वर्तवल्यापेक्षा जास्त पाऊस त्यांनी न सांगितलेल्या भागात झाला. आंतरराष्ट्रीय मॉडेल्सवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे तथ्य आहे. ‘इंटरनॅशनल थोरपेक्स प्रोग्रॅम’अंतर्गत येणाऱ्या पाच मॉडेल्सच्या आधारे जगातील तीव्र हवामान बदलांचा अंदाज दिला जातो. यातल्या एकाही मॉडेलला ११ फेब्रुवारीच्या गारपिटीचा अचूक अंदाज देता आला नाही.  तसेच या मॉडेल्सनी कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि राजस्थानात अतिवृष्टीचा इशारा दिला, जो पूर्ण चुकीचा ठरला’, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

 

साडेचारशे कोटींचा ‘प्रत्युष’, लवकरच मिळेल अचूक अंदाज  
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) साडेचारशे कोटींचा  सुपर कॉम्प्युटर गेल्याच महिन्यात आणला गेला. देशातली ही पहिलीच मल्टी पेटाफ्लॉप्स सुपर कॉम्प्युटर एचपीसी प्रणाली आहे. या सुपर कॉम्प्युटरचे नामकरण ‘प्रत्युष’ करण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त जगात फक्त जपान, इंग्लंड, अमेरिका या तीनच देशांकडे या क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आहे. ‘आयआयटीएम’चे संचालक प्रा. रवी एस. नन्जुनदैया यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘उष्णतेची लाट, गारपीट, वीज पडणे, अतिवृष्टी, सुनामी या तीव्र हवामान प्रक्रियांचे अचूक अंदाज देणाऱ्या मॉडेल्सल्या संशोधनासाठी सुपर कॉम्प्युटरचा उपयोग सुरू झाला आहे. 

 

सरकार, विद्यापीठांची जबाबदारी
गारपीट रोखण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. त्याचे भाकीत अचूक वर्तवण्यासाठी विस्तृत डाटा असणे आवश्यक आहे. सध्या असा डाटा उपलब्ध नाही. मॉडेल्सच्या अंदाजात नेमकेपणा येण्यासाठी हवामान शास्त्रज्ञांना ही माहिती गरजेची असते. डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सुचवले, की गारपीट होताना संबंधित परिसरातल्या सरकारी यंत्रणा आणि कृषी विद्यापीठांनी खालील नोंदी बिनचूक टिपण्याची सवय लावून घ्यायला हवी...

- गारपीट सुरू होण्याची, संपण्याची वेळ.  
- पाऊस सुरू होण्याची, संपण्याची वेळ.  
- गारपीट थांबल्यानंतर किती वेळ पाऊस हाेता ?  
- गारपीट- पावसात विजा चमकल्या का?  
- गारांचा आकार. आघाताचे परिणाम काय ?  
- गारांची, गारपिटीचे फाेटाे व चित्रीकरण.

बातम्या आणखी आहेत...