आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा महाराष्ट्र-कर्नाटकात ‘क्लाऊड सिडींग’चा प्रयाेग, मोहिमेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता महाराष्ट्रात हमखास पावसाचा प्रदेश नाही. पश्चिम घाटाखाली पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पावसाळी ढगांमध्ये ‘क्लाऊड सिडींग’ अवर्षणग्रस्त भागातील पाऊसमान वाढवणे शक्य आहे का याचा अभ्यास सत्तरच्या दशकापासून भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी - आयआयटीएम) करते आहे.

 

यंदाही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात ‘क्लाऊड सिडींग’चे प्रयोग होणार आहेत. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मोहिमेचे नेतृत्व तारा प्रभाकरन या महिला शास्त्रज्ञाकडे सोपवण्यात आले आहे, हे विशेष. सोलापूर हे मध्यवर्ती केंद्र मानून यंदा ‘क्लाऊड सिडींग’ केले जाईल. जमिनीवरून ढगांची निरीक्षणे नोंदवण्यासाठी सोलापूरच्या नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्रणा उभारली गेली आहे. यात प्रामुख्याने सी बंॅड रडारचा समावेश आहे.

 

सोलापूरच्या भोवतालच्या ४०० बाय ४०० चौरस किलोमीटर परिसरात येत्या जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत क्लाऊड सिडींग केले जाणार आहे. याचा उपयोग सोलापूर, पुणे, मराठवाड्यासह सीमावर्ती कर्नाटकातील काही तालुक्यांना होईल. या संदर्भात तारा प्रभाकरन यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला.  

 

‘क्लाऊड सिडींग’मधून काय फल निष्पत्ती अपेक्षित आहे? किती खर्चयेईल?  
तारा प्रभाकरन : सोलापुरातले ‘क्लाऊड सिडींग’ हा अभ्यासासाठी केला जाणार पूर्णतः शास्त्रीय प्रयोग आहे, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. कृत्रिम पाऊस पाडण्याचा उद्देश यामागे नाही. जास्त पाऊस पाडण्यासाठी कोणते घटक कारणीभूत होतात याची अधिकची माहिती या प्रयोगाअंती मिळू शकेल. पश्चिम घाटाखालच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात जास्त पाऊस पडण्यासाठी कोणती हवामानस्थिती अनुकूल ठरते, कोणत्या प्रकारांच्या ढगांना लक्ष्य केले पाहिजे, पर्जन्यछायेच्या प्रदेशात नैसर्गिकरीत्या पावसाळी ढगांची निर्मिती कशी होते याचा अभ्यास करणे हा मुख्य उद्देश आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशातील पावसाच्या नैसर्गिक प्रक्रियेसोबतच ‘क्लाऊड सिडींग’नंतरचे परिणामही तपासले जाणार आहेत.

 

या प्रकल्पाला क्लाऊड एरोसोल इंटरअँक्शन अँड प्रेसिपिटेशन एनहान्समेंट एक्सपरिमेंट (कायपेक्स) असे नाव आहे. कायपेक्स अंतर्गत २००९ पासून ढगांची निरीक्षणे घेतली जात आहेत. पावसाळी ढगांची निर्मिती आणि प्रत्यक्ष पाऊस पडण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास आणि त्याआधारे परिणामकारक ‘क्लाऊड सिडींग’साठीचे प्रोटोकॉल्स निश्चित करणे हे या प्रयोगातून अपेक्षित आहे. या दृष्टीने ढगांची निरीक्षणे नोंदवण्यासाठी जमिनीवर यंत्रणा उभी केली आहे. ढगांचे आकार, पावसाचे थेंब यांच्या मोजमापासाठी आणि ‘क्लाऊड सिडींग’साठी वेळोवेळी विमानाचा उपयोग केला जाईल.  


क्लाऊड सिडींगचे प्रयोग जगभरात अनेक ठिकाणी झाले आहेत. त्यातून हा प्रयोग व्यवहार्य असल्याचे सिद्ध झाले आहे का?  

तारा प्रभाकरन : ‘क्लाऊड सिडींग’मुळे पाऊसमान वाढल्याचे जगातल्या काही प्रयोगानंतर जगात आढळून आले आहे. मुख्य मुद्दा हा, की ‘क्लाऊड सिडींग’मुळे पाऊसमानात झालेली वाढ आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे पडलेला पाऊस यातला फरक नेमकेपणाने टिपण्यात अडचणी आहेत. पाऊस पडण्याची प्रक्रिया जटिल आहे. बाष्पाचे थेंबात रूपांतर होतानाच्या नोंदी टिपणे, निरीक्षणे घेणे खूप अवघड काम आहे. ‘क्लाऊड सिडींग’मुळे पाऊसमानात होणारी वाढ शोधण्यासाठी ढग निर्मिती आणि बाष्पाचे थेंबात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेची शास्त्रीय उकल करावी लागते.  


आजवरच्या प्रयोगांत काय दिसून आले?  
तारा प्रभाकरन : ‘क्लाऊड सिडींग’चे प्रयोग सत्तरच्या दशकात देशात सुरू झाले. ढगांची निरीक्षणे घेण्याच्या पद्धतींमध्ये आता आमूलाग्र बदल झाले आहेत. ढग, बाष्प आणि बाष्पाचे पावसात रूपांतर होण्याची प्रक्रिया यांची निरीक्षणे सध्याच्या अत्याधुनिक उपकरणांमुळे अधिक प्रभावीपणे घेता येतात. कायपेक्सच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण निरीक्षणे यापूर्वी नोंदवली आहेत.  
‘क्लाऊड सिडींग’ हे अवर्षणाला उत्तर ठरू शकते का?  
तारा प्रभाकरन : प्रकल्पाची व्याप्ती काय आणि तो कुठे राबवला जाणार यावर ते अवलंबून आहे. जगातल्या ५० देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी ‘क्लाऊड सिडींग’ केले जाते. अनेक देशांमध्ये पाणलोट क्षेत्रातले पाऊसमान वाढवण्यासाठी ‘क्लाऊड सिडींग’ केले जाते.

  
भारतात जवळपास पन्नास वर्षांपासून ‘क्लाऊड सिडींग’चा अभ्यास सुरू आहे. इतर अनेक देशांनी यावर प्रयोग केले आहेत. तरीही ‘क्लाऊड सिडींग’च्या उपयोगितेबद्दल ठाम निष्कर्ष का देता येऊ नये?  
तारा प्रभाकरन : पावसाळी ढग आणि प्रत्यक्ष पाऊस पडण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल, गुंतागुंतीची असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे. ‘क्लाऊड सिडींग’चा नेमका परिणाम समजून घेण्यासाठी ‘सिडींग’पूर्वी आणि ‘सिडींग’नंतरच्या ढग आणि त्यांच्या वातावरणाचा अभ्यास करावा लागतो. पाऊस निर्मितीच्या वेळची अवकाशसंदर्भातली कालबद्ध माहिती, निरीक्षणे नोंदवावी लागते. या विस्तृत माहितीसाठी सी बंॅड रडार अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ‘आयआयटीएम’ने सन २०१०- ११ मधील ‘क्लाऊड सिडींग’नंतर सांख्यिकी प्रयोगासाठी ढगांचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी फार कमी नमुने हाती आले की ज्यामुळे निष्कर्षांपर्यंत पोचता आले नाही. या संदर्भात आणखी सखोल जाण्याची गरज आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियात अनेक वर्षांपासून हे प्रयोग होतात, मात्र आणखी निरीक्षणांची गरज आहे. पर्जन्यमान वाढीसाठी उपयुक्त ठरणारी हवामान प्रक्रिया जाणण्यासाठी आणखी शास्त्रीय पुराव्यांची आवश्यकता आहे.  

 

‘क्लाऊड सिडींग’ म्हणजे काय?  
किनारपट्टीच्या भागात किंवा महाबळेश्वरसारख्या डोंगरी भागात पाऊस देण्याची क्षमता असणारे ढग जमिनीपासून सुमारे एक किमी किंवा त्याहीपेक्षा कमी उंचीवर असतात. इतरत्र ते साधारणतः दोन किमी उंचीवर असतात. या ढगांची उंची सात किलोमीटरपर्यंत असू शकते. पाऊस देणाऱ्या ढगांचा शोध रडारने घेतला जातो. या ढगांवर विमानातून मीठ, सिल्व्हर आयोडाइड, ड्राय आईस आदी रसायनांचे फवारे मारले जातात. ही प्रक्रिया म्हणजे ‘क्लाऊड सिडींग’ होय. रसायनांमुळे ढगातल्या मेघबिंदूंचे एकत्रीकरण होऊन पावसाचा थेंब तयार होतो आणि ढगांमधले बाष्प पावसाच्या रूपाने जमिनीवर येते. 

 

कृत्रिम पावसासाठी मेघबिंदूंचा मागोवा  
सुमारे एक लाख मेघबिंदू एकत्र आल्यानंतर पावसाचा एक थेंब तयार होतो, यावरून ढगांमधले मेघबिंदू किती छोटे असतात हे लक्षात येईल, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, की पावसाळी ढग दिसतात पण पाऊस पडत नाही, हे छोट्या मेघबिंदूंमुळे घडते. सी रडार मोठे मेघबिंदू असलेल्या ढगांचा शोध घेते. ‘क्लाऊड सिडींग’मुळे मेघबिंदूंचे एकत्रीकरण होते. त्यामुळे मेघबिंदूंचे वजन आणि आकारमान वाढते आणि पाऊस पडतो. अनुकूल हवामानात एरवी ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या होते. सुमारे पाच किलोमीटर उंच आणि दोन किलोमीटर त्रिज्येच्या ढगात सुमारे सहा कोटी लिटर पाणी असते. परंतु, ढगात जेवढी वाफ असते त्यापैकी २० टक्के वाफेचेच रूपांतर पावसात होते. उर्वरित वाफ विरून जाते.’

 

‘सी बँड ’ रडार कशासाठी?  

‘रडारच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय लहरी सोडल्या जातात. एखाद्या वस्तूवर आदळून त्या परावर्तित होऊन परततात. यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून संबंधित वस्तूचे अंतर, आकारमान आदी निरीक्षणे घेतली जातात. या लहरी सोडण्याच्या वारंवारितेवर (फ्रिक्वेन्सी) रडारचा प्रकार ठरतो. वेगवेगळ्या उद्देशासाठी भिन्न रडार असतात. चक्रीवादळांचा आगावू अंदाज येण्यासाठी किनारपट्टीवर आपण ‘एस बंॅड’ रडार बसवली आहेत. चक्रीवादळ ४०० किमी अंतरावर असतानाच ती त्याचा अंदाज देतात. ‘सी बंॅड’ रडारचा उपयोग ढगांमधल्या मेघबिंदूंच्या शोधासाठी केला जातो.’  

-जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानतज्ञ.  

 

क्लाऊड सिडींग’चे फायदे-तोटे अनेक मुद्द्यांवर अवलंबून आहेत. फायदे म्हणाल तर पाणलोट क्षेत्रात याचा प्रभावी वापर शक्य आहे. त्यासाठी ‘क्लाऊड सिडींग’चे योग्य नियोजन करावे लागेल. हवामानविषयक तंतोतंत माहिती यामध्ये कळीची आहे. जास्तीत जास्त निरीक्षणे, ढगांचा अभ्यास आणि सविस्तर संख्यात्मक तुलनेतूनच हे शक्य आहे. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेवर विविध हवामान घटकांचा परिणाम होतो. यात प्रचंड अनिश्चितता असते आणि कमालीचे बदल यात क्षणाक्षणाला घडतात. कशामुळे काय होईल हे नेमकेपणाने सांगणे अवघड असते. ‘क्लाऊड सिडींग’चा परिणाम अभ्यासण्यासाठी भौतिक आणि सांख्यिकी अवलोकन त्यामुळेच अत्यावश्यक ठरते.  


यापूर्वीच्या अनेक अभ्यासांची मदत ‘क्लाऊड सिडींग’ची प्रक्रिया निर्दोष करण्यास होते. ‘क्लाऊड सिडींग’चा परिणाम नोंदवणारे फार थोडे अभ्यास उपलब्ध आहेत. शिवाय, हे अभ्यास ज्या प्रकारच्या ढगांवर झाले, त्यापेक्षा भारतात आढळणारे ढग भिन्न आहेत. वेगाने बदलणारे संवहनी ढग आपल्याकडे आढळतात, ज्यांच्यावरचे ‘क्लाऊड सिडींग’ किचकट आहे. या ढगांचा परस्परांवरील प्रभाव आणि त्यांच्यातल्या गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याकडचे प्रयोग महत्त्वाचे आहेत.   

 

बातम्या आणखी आहेत...