आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटलांच्या गावापासून स्वाभिमानी संघटनेची यात्रा; राजू शेट्टी उतरणार रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटना एक मेपासून राज्यात नव्या यात्रेवर निघणार आहे. “मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार आहे,” असा संदेश देण्यासाठी ही यात्रा असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या गावापासून या अभियानाचा प्रारंभ हाेणार अाहे.  


कम्युनिस्टांच्या अखिल भारतीय किसान सभेने येत्या १ जूनला राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सध्या राज्यात हल्लाबोल सभा चालू आहेत. या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’नेही रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नेतृत्व कोणाकडे हा संघर्ष राजकीय पटलावर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातही राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू न शकल्याचे सांगत आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्याचवेळी ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’नेही आसूड यात्रा काढली होती. आमदार बच्चू कडू यांची संघर्ष यात्राही गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात निघाली होती.  


गुरुवारी शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची माहिती दिली. ते म्हणाले, की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही अभियान सुरू करत आहोत. वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातल्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रवास करून नऊ मे रोजी उस्मानाबाद येथे अभियानाची सांगता होणार आहे. धर्मा पाटील यांचा मुलगा या अभियानात सहभागी होणार आहे.    


दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मराठवाड्यातल्या प्रा. प्रकाश पोफळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अॅड. योगेश पांडे व अनिल पवार यांच्यावर पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 

तुपकरांना बढती  
स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तुपकरांना राज्य सरकारने वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. मात्र  गेल्या वर्षीच्या मे महिन्यात राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली तेव्हा तुपकरांनी या महामंडळाचा राजीनामा दिला हाेता. प्रत्यक्षात  तुपकर यांनी सरकारी बंगला व इतर लाभ यांचा अजूनही त्याग केला नसल्याचे सांगितले जाते. या संदर्भात शेट्टी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी “तुपकरांनी दिलेला राजीनामा सरकारने अजून स्वीकारला नाही. तुपकरांनी मात्र सरकारी लाभ घेणे बंद केले आहे,” असा दावा त्यांनी केला.  

 

बातम्या आणखी आहेत...