आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, टेम्पो बॅरिकेड तोडून उलटला, 18 प्रवासी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात (जि. सातारा) ३२ कामगारांना घेऊन जाणारा  टेम्पो घाटातील धोकादायक ‘एस कॉर्नर’ वळणावर उलटला. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात १८ जण ठार, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात टेम्पोचालकही मृत्युमुखी पडला. मृतांमध्ये ७ महिला आणि एका मुलासह अकरा पुरुषांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या प्रवासामुळे चालकाला झोपेची गुंगी येत होती आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे समजते.


खंडाळा तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,केए-३७/६०३७ क्रमांकाचा टेम्पो कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामगार घेऊन निघाला होता. टेम्पो हा मालवाहतुकीचा होता. मात्र, त्यात अत्यंत दाटीवाटीने ३५ कामगार काही अवजड सामानांसह बसवण्यात आले होते.  मंगळवारी सकाळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातून भरधाव वेगात जात असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याकडेच्या सहा फुटी भिंतीवर आदळून उलटला. नंतर कठडा तोडून पलटला. टेम्पोतील अवजड सामान आदळल्याने १७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमी झाले. अपघातग्रस्त टेम्पोच्या मागून येणाऱ्या त्यांच्याच गटातील दोन दुचाकीस्वारांनी ही घटना खंडाळा पोलिसांना कळवली. पोलिसांनी जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले.  


अदलाबदलीत काळाचा घाला 

मुकादम विठ्ठल राठोड टेम्पोमागून दुचाकीवर चालला होता. पहाटे थंडी वाढल्याने तो दुचारीवरून  उतरून टेम्पोत बसला आणि  चंद्रकांत पवार त्याच्याऐवजी दुचाकीवर बसला. अपघातात विठ्ठल जागीच ठार झाला, तर काही वेळापूर्वी त्यातून उतरलेला पवार मात्र सुदैवाने बचावला. दरम्यान, टेम्पोत असलेले सर्वजण जखमी झाले. मात्र, त्यातच असलेल्या शेळीला मात्र साधे खरचटले देखील नाही.  

 

लवकर पोहाेचण्याची घाई पडली महागात   
कर्नाटकातून येताना रात्रभर अथक प्रवास केल्याने प्रवाशांसह चालकही थकला होता. कुठेही विश्रांती न घेता ते प्रवास करत होते. बोगदा संपल्यानंतर भोरजवळ विश्रांती घेण्याचे ठरवून लवकर पोहाेचण्याच्या नादात चालकाने टेम्पो भरधाव सोडला, पण तो अतिवेगच अखेर साऱ्यांना मृत्यूच्या दाढेत पोहाेचवणारा ठरला.  

 

सांघिक शवविच्छेदन   
खंडाळा ग्रामीण रुग्णालयात सर्व मृतदेहांचे  शवविच्छेदन होण्यास किती वेळ लागणार, याची काळजी  सर्वांना होती. पण  खंडाळासह लोणंद,  शिरवळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  एकत्र येऊन सांघिकपणे, प्रसंगाचे गांभीर्य जाणून  शवविच्छेदन पूर्ण केले आणि नातेवाईक आणि पोलिस यंत्रणेला दिलासा दिला.

 

पुढील स्लाइडवर वाचा मृतांचे नावे.....

बातम्या आणखी आहेत...