Home | Maharashtra | Pune | Ajit Pawar should be CM, Supriya Sule appealed

अजितदादांना मुख्यमंत्री करा, सुप्रिया सुळेंचे आवाहन

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 11, 2018, 01:28 AM IST

सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी होणार का, जागावाटप कसे ठरणार, आघाडी झाल्यास-किंवा न झाल्यास कोण किती जागा जिं

 • Ajit Pawar should be CM, Supriya Sule appealed

  पुणे - सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी होणार का, जागावाटप कसे ठरणार, आघाडी झाल्यास-किंवा न झाल्यास कोण किती जागा जिंकणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अद्याप अधांतरी आहेत. तोवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजित पवार असतील, असे त्यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी एका सभेत जाहीर केले.


  ‘राष्ट्रवादी’ची हल्लाबोल सभा मंगळवारी पुणे जिल्ह्यात शिरूर येथे झाली. या सभेत सुळे म्हणाल्या, “अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी नुसते सभेला येऊन, भाषणे ऐकून चालणार नाही. गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन प्रत्येकाला राष्ट्रवादी विचार पटवून सांगा.’ २०१९ च्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचे असेल तर त्याची सुरुवात शिरूर लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून झाली पाहिजे. उमेदवार न बघता पक्षाला महत्त्व द्या’, असे सुळे म्हणाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघ तीन ‘टर्म’पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे, तर विधानसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपने ‘राष्ट्रवादी’कडून खेचून घेतला.


  ‘राष्ट्रवादी’चे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, “निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची आमची प्रथा नाही हे खरे आहे. आमदार नेता निवडीचा निर्णय घेतील, असे शरद पवार सांगतात. यापूर्वीचे उपमुख्यमंत्री पक्षाने याच पद्धतीने निवडले. मात्र, बदलत्या परिस्थितीत मतदारांपुढे प्रभावी चेहरा उभा करावा लागतो. या नेत्याच्या मागे गेलो तर आपले भले होईल, असा विश्वास लोकांना द्यावा लागतो.’

  दादांना कोणाचाच विरोध नाही
  ‘अजित पवारांच्या तोडीचे अनेक नेते आमच्यात आहेत. मात्र, त्यांच्याइतकी लोकप्रियता आणि संघटनात्मक कौशल्य कोणाकडे नाही. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबद्दल पक्षात दुमत होईल, असे मला वाटत नाही. पक्षात दुमत राहील, असे मला वाटत नाही. अजितदादा चांगले मुख्यमंत्री होऊ शकतात हे त्यांच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीने सिद्ध केले आहे. अर्थात अंतिम निर्णय शरद पवारच घेतील.’
  - अंकुश काकडे, प्रदेश प्रवक्ते.

Trending