आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवड्याभरात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना द्या; कृषी खात्याच्या सचिवांचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी शुक्रवारी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. खरीप २०१७ मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे अादेश बाबत अपर मुख्य सचिवांनी दिले.


दोन आठवड्यांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत आढावा  बैठक घेतली होती, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठीअपर मुख्य सचिवांनी पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. ‘विमा कंपन्यांना सरकारने पीक उत्पादकतेविषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी,’ असे विजयकुमार म्हणाले. त्यावर बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याचे विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले.


 राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका. त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा, अशा स्पष्ट सूचना अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी  या वेळी बोलताना  केल्या. 


८१ लाख शेतकऱ्यांनी काढला विमा
गेल्या खरीप २०१७ मध्ये सुमारे ८१ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला हाेता. त्यातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. या आठवड्यातच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असेही विजयकुमार यांनी या वेळी बोलताना सांगितले. या बैठकीस ओरिएंटल इन्श्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, अग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कंपनी, रिलायन्स जनरल आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...