आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'टास्क मास्टर' शहांनी सांगितली चाणक्याची 'कूटनीती'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चोवीसशे वर्षांपूर्वी चाणक्याने सांगितले, की राजाचा पुत्र 'सुझबुझवाला' नसेल तर त्याला कधीही राजा बनवता कामा नये. घराणेशाहीला महत्त्व न देता जो श्रेष्ठ आहे, राष्ट्राच्या हिताचा आहे त्याचीच निवड केली पाहिजे. चाणक्याने सांगितले, की राजासाठी- कोण्या व्यक्तीसाठी नाही तर प्रत्येकाने राष्ट्रासाठी काम केले पाहिजे.' चाणक्याला त्याच्या शिष्याने प्रश्न केला, की काही गणनेत्यांच्या हत्यांचा आरोप तुमच्यावर आहे. त्यावर चाणक्य उत्तरला, ''मी माझ्यासाठी काहीही केले नाही. राष्ट्रासाठी केले. सत्य-असत्य असे काही नसते. जे करताना अंतःकरण डगमगत नाही तेच सत्य असते, जे कृत्य करताना अंतरात्मा डगमगतो ते असत्य असते'.....- ही सगळी वाक्ये भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांनी रविवारी अार्य चाणक्यांबद्दल वापरली. मात्र उपस्थितांनी त्याचे चालू राजकारणाशी संदर्भ लावून 'याेग्य ताे अर्थ' घेतला. 


"लहानपणी मी आर्य चाणक्य वाचले नसते तर मी घडलो नसतो. राष्ट्राकडे पाहण्याची दृष्टी मला मिळाली नसती. चाणक्याने मला घडवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला आकार दिला," या शब्दांत शहा यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व, प्रेरणा आणि आदर्श या संदर्भात भाष्य केले. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानात 'आर्य चाणक्य - जीवन आणि कार्य : आजच्या संदर्भात,' या विषयावर रविवारी (ता. ८) ते पुण्यात बोलत होते. 


नरेंद्र मोदी यांचे 'टास्क मास्टर' आणि भाजपच्या इतिहासात पक्षाला सर्वाधिक राजकीय यश मिळवून देणारे अमित शहा बोलत होते आर्य चाणक्यांबद्दल. श्रोते मात्र त्यांचे प्रत्येक वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीशी ताडून पाहात होते. "परिवारवाद का विच्छेदन और क्षमता के आधार पर नेतृत्व,' हा चाणक्याचा दाखला दिल्यानंतर श्रोत्यांमध्ये हशा पिकला. स्वतः शहा यांनी मात्र राजकीय भाष्य करणे कटाक्षाने टाळले. अपवाद त्यांनी दोनवेळा केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख. शहा म्हणाले, "राजा हा देवाचा अंश असतो, अशी पूर्वीची समजूत होती. चाणक्याने ती खोडून काढली. त्याने पहिल्यांदा सांगितले, की राजा हा प्रजेचा दास आहे आणि संविधानाचा सेवक. मला माहिती नाही नरेंद्रभाईंनी चाणक्य वाचलेत की नाही, पण ते जेव्हा स्वतःला प्रधानसेवक म्हणतात तेव्हा ते चाणक्यांची शिकवण आचरणात आणत असतात." अप्राप्य को प्राप्त करना, प्राप्त को रक्षित करना. रक्षित की वृद्धी करना और जनता मे समान रूप से फायदा पहुंचे ऐसा वितरण करना, ही चाणक्याची शिकवण असल्याचे शहा म्हणाले. "सबका साथ, सबका विकास," असे मोदी चाणक्य वाचून म्हणतात का हे मला माहिती नाही, अशी टिप्पणी शहा यांनी केली. 


'सत्य तो मौन है. जिस असत्य को सब लोक स्विकार कर ले वोही सत्य है,' हे चाणक्यांचे विधान अमित शहा यांनी उद्धृत केले. साम-दाम-दंड-भेद या कूटनीतीचा उपयोग राष्ट्रासाठी केला पाहिजे, असे ठणकावून सांगितले. 


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, व्ही. सतीश, रेखा प्रमोद महाजन, योगेश गोगावले आदी या वेळी व्यासपीठावर होते. प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी प्रास्ताविक केले. 

 

श्रोते जमवण्याची काळजी

अमित शहा यांच्या व्याख्यानासाठी पुण्यातले उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, सनदी अधिकारी, निवृत्त सेनाधिकारी, व्यापारी अशा सर्व क्षेत्रातील प्रमुख उपस्थित राहतील याची काळजी भाजपने घेतली होती. या शिवाय पुण्याच्या सर्व भागातून प्रतिष्ठित नागरिकांना विशेष निमंत्रण देऊन कार्यक्रमाला आणण्यात आले होते. राष्ट्रीय अध्यक्षांच्या भाषणाला खचाखच गर्दी जमवण्यात भाजपचे पदाधिकारी यशस्वी झाले. 


भ्रष्टाचाराशिवाय राज्य नसते.. 
विदेशनीतीचा आधार आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष आणि दुसऱ्या राष्ट्राचा क्षय असाच असला पाहिजे, हे चाणक्याने सांगितले. राज्यकारभारावर निर्भयपणे अंकुश ठेवणाऱ्या 'रेग्युलेटर'ची संकल्पना चाणक्याने आणली होती. मात्र त्याचवेळी "माझ्या राज्यात भ्रष्टाचार नाही असे कोणी राजा म्हणत असेल तर त्याचे ते विधान जिभेवर मध ठेवून ते गोड लागत नसल्याचे म्हणण्यासारखे आहे. पाण्यातल्या माशाने पाणी किती आणि केव्हा प्यायले हे समजत नसते," असे सांगत शहा यांनी भ्रष्टाचाराशिवाय राज्य नसते, हा चाणक्याचा दाखलाही अमित शहा यांनी दिला. 

बातम्या आणखी आहेत...