आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीची परीक्षा अाजपासून, वेळेत हजर राहण्याचे बंधन; 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी देणार परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू हाेत अाहेत. ‘सोशल मीडिया’तून होणाऱ्या संभाव्य पेपरफुटीचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसू नये, या उद्देशाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याची सूचना राज्य शिक्षण मंडळाने केली आहे.  तसेच यंदापासून प्रथमच उत्तरपत्रिका व पुरवण्यांना बारकाेड लावण्यात येईल.


राज्यातल्या नऊ विभागीय मंडळातील विविध शाखांच्या १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘विद्यार्थ्यांनी वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे,’ असे आवाहन काळे यांनी केले आहे.  


बुधवारी इंग्रजी विषयाने परीक्षा सुरू होईल. प्रश्नपत्रिका वितरित केल्यानंतर काही क्षणात सोशल मीडियातून ‘व्हायरल’ करण्याचे प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे आढळून आले आहे. ‘व्हायरल’ प्रश्नपत्रिकांच्या आधारे तयारी करुन परीक्षा दिली जात असे. नियोजित वेळेनंतर अर्ध्या-एक तासाने परीक्षेला यायचे आणि आधीच पाहिलेली प्रश्नपत्रिका सोडवायची, असा उद्योग काही ‘कॉपीबहाद्दरां’नी सुरु केला आहे. यावर उपाय म्हणून नियोजित वेळ टाळून, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेआधीच परीक्षा केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. राज्यातल्या २ हजार ८८२ केंद्रांवर परीक्षा होईल.  


विशेष भरारी पथके  
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बाेर्डाने ‘गैरमार्गाशी लढा’ हे अभियान राबवण्याचे आदेश विभागीय मंडळांना दिले अाहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याला ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके राज्यात नेमली अाहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. विशेष महिला भरारी पथक आणि कॉप्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या काही जिल्ह्यांसाठी विशेष भरारी पथकांचीही नियुक्ती केली अाहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन व्हावे, यासाठी परीक्षेच्या वेळेआधी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनंतर उघडले जाणार आहे.


यंदा प्रथमच
- उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल टाळण्यासाठी दोन्हीवर यंदा प्रथमच बारकोड छापण्यात आला आहे.   
- व्यवसाय शिक्षण विषयक अभ्यासक्रमांतर्गत ई-१ ते ई-७ या विषयांची परीक्षा यंदा प्रथमच १५८ विद्यार्थी देणार.  
- प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना ऑनलाइन हॉल तिकीट दिले.


विषय शिक्षकांना पंचायत समितीत थांबावे लागेल
बुलडाणा- बारावीची परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाच्या शिक्षकांना संबंधित पेपर सुरू हाेण्याच्या अर्धा तास अाधी व पेपर सुटल्यानंतरही अर्ध्या तासापर्यंत संबंधित पंचायत समितीमध्ये उपस्थित राहावे लागेल. संबंधित विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राच्या आवारात आढळला किंवा तोंडी उत्तरे सांगणे, सांकेतिक भाषेचा उपयोग करून परीक्षार्थींना मदत करताना दिसल्यास त्यांच्यावर फाैजदारी कारवाईचा इशाराही देण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...