आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाहीवाल्यांशी हातमिळवणी करूनच भाजप सत्तेवर; डॉ. नीलम गोऱ्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’च्या जयश्री बोकील यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान आला. - Divya Marathi
‘दिव्य मराठी’च्या जयश्री बोकील यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान आला.

पुणे - महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूक्ष्म अभ्यास असलेल्या वरुणराज भिडे यांनी राज्यातील शंभर कुटुंबांमध्येच राजकीय सत्ता आहे, अशी भूमिका विस्तृत लेखनाद्वारे मांडली होती. अशा घराणेशाहीवाल्यांशी हातमिळवणी करूनच भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली आहे, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केली. शिक्षणमंत्री तरी बदला किंवा सरकार तरी बदला..त्याशिवाय राज्यातील शिक्षणाची परिस्थितीही सुधारणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 

  
पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे गोऱ्हे यांच्या हस्ते ‘दिव्य मराठी’च्या वरिष्ठ बातमीदार जयश्री बोकील यांना वरुणराज भिडे स्मृती आश्वासक पत्रकार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी यांना ‘वरुणराज भिडे स्मृती मुख्य पुरस्कार’, तर ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद येथील खास प्रतिनिधी सुहास सरदेशमुख आणि ‘न्यूज १८ लोकमत’चे महेश तिवारी यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे केंद्रातर्फे ‘चालू घडामोडी’ या विषयात प्रावीण्य संपादन करणाऱ्या भाग्यश्री चौथाई आणि चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

  
गोऱ्हे म्हणाल्या, वरुणराज यांच्याकडे पत्रकारितेचा तिसरा डोळा होता. वर्तमानपत्रे उत्पादन होत आहेत का, ही चिंता त्यांना होती. व्यासंगी पत्रकाराने आपल्याविषयी लिहावे, असे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला वाटत असते. मी आमदार होण्याआधीच ते आपल्यातून गेल्याने माझ्याबाबतीत ते घडले नाही. हल्ली लोकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात, हे विधिमंडळातील राजकीय नेत्यांचे अपयश आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.    


सामान्य माणूसही चुकत असतो  
महाराष्ट्राचे दारुण चित्र अभिमान वाटावे असे नाही. पण, सरकारची प्रत्येक गोष्ट वाईट आहे, असे म्हणणे आणि राजकीय चष्म्यातून बातमीदारी करणे योग्य नाही. विकासाकडेही पाहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...