आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल करणाऱ्या अजितदादांना भाजपकडून गावातच धाेबीपछाड; राष्ट्रवादीचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारविरोधात भाषणे देत राज्यभर फिरत असताना त्यांच्याच गावात भाजपने विजयाचा झेंडा फडकवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पवारांच्या माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) ग्रामपंचायतीत ‘कमळ’ फुलले. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या जयदीप विलास तावरे यांनी साेमवारी राष्ट्रवादीच्या राजेंद्र चव्हाण यांचा एका मताने पराभव केला. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली. 


शरद पवारांचा ‘गाेविंदबाग’ हा बंगला माळेगावातच अाहे. मात्र येथील स्थानिक राजकारणाची सूत्रे सध्या अजित पवारांकडे अाहेत.    माळेगाव साखर कारखान्यावरची सत्ता तीन वर्षांपूर्वीच रंजन तावरे यांनी अजित पवारांकडून काबीज केली होती. त्याचा वचपा पवारांनी वर्षभरापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काढला. या निवडणुकीत तावरे यांच्या कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला. त्याची परतफेड रंजन तावरे यांनी माळेगाव ग्रामपंचायतीत केली. नूतन सरपंच जयदीप हे रंजन तावरे यांचे पुतणे आहेत.   


गेली अडीच वर्षे माळेगावचे सरपंचपद राष्ट्रवादीच्या जयदीप दिलीप तावरे यांच्याकडे होते. अजित पवारांच्या  सूचनेवरून २६ डिसेंबरला त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हे पद पुन्हा ‘राष्ट्रवादी’कडेच राहावे यासाठी अजित पवारांनी लक्ष घातले होते. भाजपच्या बाजूने रंजन तावरे, स्वरूप वाघमोडे यांनी किल्ला लढवला. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच राष्ट्रवादीचे सदस्य अशोक सस्ते, विजयमाला पैठणकर, रवींद्र वाघमोडे यांनी थेटपणे भाजपशी सूत जुळवले. याचा फायदा घेत भाजपने बहुमतासाठी आवश्यक ९ सदस्य जमवून सहलीवर रवाना केले.

 

भाजपकडून ही व्यूहरचना केली जात असताना राष्ट्रवादी मात्र गाफील राहिली.   अशोक सस्ते यांना सरपंचपद दिल्यास निवडणूक बिनविरोध करतो, असाही प्रस्ताव भाजपने ‘राष्ट्रवादी’ला दिला हाेता. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने भाजपकडून जयदीप विलास तावरे, अशोक सस्ते तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले.  अशोक सस्ते, रवींद्र वाघमोडे, विजयमाला पैठणकर, गंगाधर भोसले, लियाकत तांबोळी, शीतल खरात, मंगल लोणकर, पल्लवी तावरे या सदस्यांनी तावरे यांना मतदान केले. त्यामुळे एका मताने राष्ट्रवादीचा पराभव झाला.  

 

सदस्यांच्या एकजुटीने पवारांना हादरा  

अजित पवार यांनी २० वर्षांपूर्वी मला मार्केट कमिटीचे अध्यक्ष करतो असे सांगून फसवणूक केली. नंतर चंद्ररावअण्णा तावरेंच्या आशीर्वादाने मी माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष झालो. आता  सरपंचपदी माझा पुतण्या जयदीप हा अजित पवारांना नको होता. मात्र, सदस्यांच्या एकजुटीमुळे त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला.  खुद्द बारामतीतही पवारांच्या वर्चस्वाला भाजप हादरा देऊ शकतो, हे आज सिद्ध झाले आहे.’  
– रंजन तावरे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...