आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- ग्रंथव्यवहारात लेखक आणि प्रकाशकांची नेहमीच चर्चा होते. पुरस्कारही त्यांनाच मिळतात. पण सर्व लेखकांची आणि प्रकाशकांची पुस्तके ज्या ग्रंथविक्री दालनांच्या मार्फत वाचकांपर्यंत पोहोचतात, ती ग्रंथदालने आणि ते ग्रंथविक्रेते मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात. पुण्यातील ‘अक्षरधारा बुक गॅलरी’ या ग्रंथदालनाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नुकताच ‘बुकस्टोअर ऑफ द इयर’ हा सन्मान मिळवला असून, रमेश आणि रसिका राठीवडेकर संचालित या ग्रंथदालनाची सर्वोत्कृष्ट ग्रंथदालन म्हणून निवड करण्यात आली आहे.
वाचनसंस्कृती संपत चालल्याची ओरड होत असताना ज्या ग्रंथदालनांनी नवनवीन कल्पना कृतीत आणून, वाचकांना ग्रंथवाचनाकडे, ग्रंथखरेदीसाठी प्रवृत्त करण्यात यश मिळवले आहे, अशा ग्रंथदालनांची स्पर्धात्मक स्वरूपात निवड करण्यात आली असून, त्यात ‘अक्षरधारा’ देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. ही निवड ‘पब्लिशिंग नेक्स्ट इंडस्ट्री अवॉर्ड’ ही संस्था २००८ पासून करत आहे. एकूण चौदा प्रवर्गांमध्ये निवड करण्यात येते. यामध्ये देशभरातून ‘बुकशॉप ऑफ द इयर’साठी अक्षरधारा बुक गॅलरीची निवड झाली आहे.
या यशाविषयी ‘अक्षरधारा’चे रमेश राठीवडेकर म्हणाले,‘ग्रंथदालनाची सर्वोत्कृष्ट म्हणून झालेली निवड हे सर्वस्वी वाचकांचे श्रेय आहे. त्याचप्रमाणे सर्व लेखक आणि प्रकाशकांचा त्यात वाटा आहे. त्यांचे शब्द, त्यांचे परिश्रम आम्ही ग्रंथरूपातून वाचकांपर्यंत नेत असतो. खरे तर ग्रंथव्यवहाराशी संबंधित प्रत्येक घटकाचा या यशात वाटा आहे.
हे असिधारा व्रत
गेली २३ वर्षे अक्षरधाराने प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लक्षावधी वाचकांशी नाते जोडले आहे. साहित्य, संस्कृती आणि कलासंबंधित विविध उपक्रमांद्वारे वाचकांच्या मनात पुस्तकांविषयी जिव्हाळा, आपलेपणा आणि प्रेम वाढीस लागावे, असा प्रयत्न केला आहे. वाचनसंस्कृतीचे जतन, संवर्धन करण्यासाठीच आमची चळवळ सुरू आहे. अक्षरधाराला मिळालेला सन्मान हा वाचनसंस्कृतीचा सन्मान आहे, अशीच आमची भावना आहे.
- रमेश राठीवडेकर, संचालक, अक्षरधारा बुक गॅलरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.