आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री बिल्डरला घराबाहेर येण्यास भाग पाडून दाेघांनी घातल्या गाेळ्या, डेक्कन परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रभात रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीत शनिवारी मध्यरात्री २ हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याने गंभीर जखमी झालेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्र जयसुखलाल  शहा (५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.  प्रभात रोडवर गल्ली क्रमांक सातमधील सायली अपार्टमेंटमध्ये शहा यांची सदनिका आहे.  शनिवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दोघांनी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील इस्त्री दुकानदाराला शिवीगाळ केली आणि शहा यांची चौकशी केली.  हा प्रकार शहा यांना समजताच ते मुलासह खाली आले. ते पुढे येताच दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. एक गोळी शहा यांच्या छातीत घुसली, तर दुसरी कमरेजवळ लागली. त्यानंतर आरोपी पसार झाले. शहा यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


मालमत्तेचा वाद की खंडणीचे कारण?
पुण्यात यापूर्वीही काही बिल्डरांना खंडणीसाठी धमकावणे व हल्ले करण्याचे प्रकार घडलेले अाहेत. शहा यांच्या हत्येमागे खंडणीचे कारणअाहे की त्यांचा कुणाशी मालमत्तेवरून वाद हाेता, याचा तपास  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम करत आहेत.


मृत बिल्डर शहांचा मुलगा म्हणाला.... ‘मारेकऱ्यांनी माझ्यावरही गाेळ्या झाडल्या, 
पण बचावलाे... अामच्या मागे येऊ नकाे असे धमकावत अाराेपी पळून गेले!’

शहा यांचे पुत्र देवेंद्र यांच्या फिर्यादीनुसार,‘आईचा वाढदिवस असल्याने शनिवारी आम्ही कुटुंबीय हॉटेलमध्ये जेवायला गेलो हाेताे. रात्री ११ वाजता घरी आलो. गप्पा मारत बसलो असताना ११.३० वाजेच्या सुमारास बेल वाजली. दार उघडल्यावर इस्त्रीवाला सुनील उभा होता. दोन व्यक्ती वडिलांचे नाव घेऊन खाली गोंधळ करत असल्याचे त्याने सांगितले. मी पार्किंगमधील सीसीटीव्ही चालू करून पाहिले तेव्हा त्यात ते दोघे  दिसले. मी चौकशीसाठी खाली निघालो तेव्हा वडील म्हणाले, मीही येतो. आम्ही दोघेही लिफ्टने खाली आलो. पार्किंगमध्ये येताच वडिलांनी त्या दोघांना ‘समोर जाऊन बोलूयात’ असे सांगितले. त्यांनी चार पावले टाकली. तेवढ्यात त्या दोघांनी आम्हा दोघांवर अचानक पिस्तूल रोखले आणि वडिलांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मी अाराेपींना पकडण्यासाठी पुढे सरसावलाे, मात्र त्यांनी माझ्याही दिशेने गोळीबार केला. पण नेम चुकला. दोन गोळ्या वडिलांच्या वर्मी लागल्या आणि ते कोसळले. मलाही हल्लेखोरांनी धमकावले. ‘आमच्या मागे येऊ नकोस’ असे सांगून ते दुचाकीवर पळून गेले. तेवढ्यात माझी पत्नीही खाली आली. आम्ही वडिलांना रुग्णालयात नेले. पण तेव्हा त्यांची प्राणज्योत मालवली.’  

बातम्या आणखी आहेत...