आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाडका बैल ‘पश्या’च्या दहाव्याला गाव हळहळला, धार्मिक कार्यक्रमाने आदरांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एखादा कर्तृत्ववान माणूस कायमचा गमावला की त्याच्या स्मृती जपण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात, कार्यक्रम ठरवतात व त्या व्यक्तीच्या आठवणींचा जागर करतात...पण मावळ तालुक्यात हे भाग्य ‘पश्या’ नामक बैलाला लाभले.


पश्या हा सर्वांचा लाडका शर्यतीचा बैल होता. जिवंतपणीच आख्यायिका बनलेला पश्या नुकताच वृद्धापकाळाने दगावला, पण त्याच्या आठवणी जागत्या आहेत.  इतक्या की, त्याच्या शनिवारी होणाऱ्या दहाव्याला ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.    
ग्रामस्थांच्या भावविश्वाचा राजा असणारा पश्या केवळ मावळ, मुळशी तालुक्यापुरता मर्यादित नव्हता.. त्याचे गुण, देखणेपण, शक्ती, वेग, चाल...यांची चर्चा जिल्हाभर होती. आपल्या दहा वर्षांच्या ‘धावत्या’ कारकीर्दीत पश्याने तब्बल अडीच हजार टायटल्स जिंकली होती...हा आकडाच त्याचे सामर्थ्य दर्शवणारा आहे. मवाळ-मुळशी परिसरातील गोडांबे कुटुंबीयांनी २००३ मध्ये दोन वर्षांच्या पश्याला विकत घेतले होते. तेव्हापासून सलग १९ वर्षे पश्या आमच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक होता, यापुढेही राहील, अशी भावना अर्जुन गोडांबे यांनी व्यक्त केली.  

 

१० वर्षे गुलाल मिरवला   
शर्यतीत जिंकलेल्या बैलाला मिरवणूक काढून वाजतगाजत गुलालाने माखून फिरवतात. पश्या इतक्या शर्यती जिंकायचा की सलग १० वर्षे त्याच्या अंगावरचा गुलाल निघालाच नाही. मूळचा पांढराशुभ्र रंगाचा पश्या या गुलालामुळे कायम गुलाबी रंगाचा दिसायचा. शर्यतीत धावणे बंद झाल्यावरच त्याचा मूळ रंग दिसू लागला होता. अखेरच्या क्षणीही पश्या पोहून आला आणि मग बसला, तो उठलाच नाही.

 

जातिवंत बेरड खिलार  
पश्या जातिवंत बेरड खिलार जातीचा बैल होता. त्याच्या रक्तात मूळचा रानटीपणा अखेरपर्यंत टिकून होता. शर्यतीत पळण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच त्याचा जन्म असावा, इतक्या शर्यती पश्याने मारल्या. बैलगाडा शर्यतींचे सगळे आयोजक वर्षानुवर्षे पश्या असेल तरच शर्यती आयोजित करायचे. कारण ज्या शर्यतीत पश्या असेल तिथे लोकांची रीघ लागायची. पश्याच्या नुसत्या दर्शनाने लोक आनंदित होत असत. त्याची ताल पाहायला लोक येत असत आणि त्याचे धावणे अनुभवणे हा निराळाच.

बातम्या आणखी आहेत...