आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- हिंगाेलीच्या अव्वल मल्ल गणेश जगतापने शुक्रवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सनसनाटी विजयाची नाेंद केली. त्याने अवघ्या दीड मिनिटात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला चितपट करण्याचा पराक्रम गाजवला. अापल्या शैलीदार खेळीने याेग्य ते पट काढून सनसनाटी विजय संपादन करताना त्याने कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत उपस्थितीत कुस्तीप्रेमींच्या डाेळ्याचे पारणे फेडले. या विजयानंतर त्याने पराभूत केलेल्या सांगलीच्या चंद्रहारच्या पाया पडून पुढील लढतीसाठीचे अाशीर्वाद घेतले. त्याच्या याच खिलाडूवृत्तीने कुस्तीसह त्याने सर्वांची मने जिंकली. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अनेक रंगतदार कुस्त्या झाल्या.
बिराजदारची विक्रांतवर मात
लातूरच्या सागर बिराजदारसमोर पहिल्या फेरीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवचे आव्हान होते. यात सागर बिराजदारने विक्रांत जाधवला ४-० ने नमवले. दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला.
अक्षयचा सचिनवर विजय
बीडच्या अक्षय शिंदेने पुण्याच्या सचिन येलभरला नमवले. ही कुस्ती वादग्रस्त ठरली. पहिल्या फेरीत सुरुवातीला सचिनने पहिला गुण घेतला. लढत संपायला आणि अक्षयने गुण घेण्याची एकच वेळ झाली. नियमानुसार (अखेरचा गुण घेणारा मल्ल विजयी) पंचांनी अक्षयला विजयी ठरवले.
शिवराजला दुखापत
पुणे शहरच्या अभिजितची सलामीची लढत पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध होती. दुखापतीमुळे शिवराजने ही लढत सोडली. त्या वेळी अभिजित ७-२ ने आघाडीवर होता. अभिजित कटके याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आणि ३ गुणांची कमाई केली. यानंतर शिवराजने दुहेरी पटाची पकड करुन २ गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आपला आक्रमक खेळ कायम राखला. पण शिवराजला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.
फ्रंट साल्ताे डाव फसल्याने चंद्र ‘हार’
गादी विभागात सांगलीच्या चंद्रहार पाटीलची पहिल्या फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापशी लढत होती. यात चंद्रहारचे पारडे जड मानले जात होते. त्यामुळे त्याला किताबाचा दावेदार मानले जात होते. गणेश जगतापने पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहार पाटीलने फ्रंट साल्तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर अवघ्या दीड मिनिटांत गणेशने चंद्रहारला चितपट केले. यासाठी कुस्तीप्रेमी माेठ्या संख्येत हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.