आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वेदोक्त प्रकरण’ ही टिळकांच्या आयुष्यातील एकमेव चूक; डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रतिगामी होते? छत्रपती शाहू आणि टिळक यांच्यातील वादात चूक कोणाची होती? देशाच्या राजकारणात टिळकांचे महत्त्व काय? मुस्लिमांबद्दलची टिळकांची मते काय होती? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘कर्मयोगी लोकमान्य’ चरित्रग्रंथात खुलासेवार सापडतील. ‘टिळकांची मंडालेहून सुटका’ या ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी म्हणजे 8 जून  1914 रोजी घडली होती. हे औचित्य साधून डॉ. मोरे यांच्याशी सुकृत करंदीकर यांनी साधलेला संवाद.


मंडालेचे ‘काळे पाणी’
व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याने 20 जुलै 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. त्या वेळी बंगालमध्ये प्रक्षोभ उसळला. सरकारविरुद्ध उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी या चळवळीला पाठिंबा देत ‘स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य’ या चतु:सूत्रीचा पुरस्कार केला. ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 12 मे 1908 रोजी ‘देशाचे दुर्दैव’ आणि 9 जून 1908 रोजी ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ असे दोन अग्रलेख लिहिले. त्यामुळे ब्रिटिशांनी टिळकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना दोषी ठरवून 6 वर्षे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा ठोठावली. टिळकांना ब्रह्मदेशातील ‘मंडाले’च्या तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगवास काळात त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. मंडाले येथून ८ जून १९१४ रोजी त्यांची मुक्तता झाली. आज त्यांच्या सुटकेला 104 वर्षे पुर्ण झाली आहेत.

 

दुसर्‍या बाजूने ‘टिळक हे बहुजनांचे शत्रू होते’, ‘ते कुठले आले तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’, असे म्हणणारेही लोक दिसून आले. माँटेंग्यु-चेम्सफर्डच्या सुधारणा आल्या. एतद्देशीयांनी कौन्सिलात निवडून जावे, काही ठरावीक लोकांना मतदानाचा हक्क मिळावा हे मान्य झाले. मग त्या वेळच्या लोकांच्या मागण्यांप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी रिझर्व्हेशन पाहिजे, असा मुद्दा आला तसे जातीनिहाय रिझर्व्हेशन झाले. सुरुवातीला टिळकांचा याला विरोध होता. टिळकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत लवचिक होते. एखादी गोष्ट त्यांनी केली आणि त्यांच्या लक्षात आले की लोकांना हे चालणार नाही तर ते शिकायचे. फीडबॅकमधून स्वत:ला बदलायचे. त्याप्रमाणे त्यांनी राखीव जागांना पाठिंबाही दिला. टिळकांचे नेतृत्वा आणि त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व हे ‘प्रगमनशील’ आहे. 

 

>ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून टिळकांची प्रतिमा प्रतिगामी, चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते म्हणून मांडली जाते. विशेषत: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि टिळक यांच्यातील संघर्षानंतर...

डॉ. मोरे : ‘वेदोक्त प्रकरण’ ही टिळकांच्या आयुष्यातील एकमेव चूक. उभ्या आयुष्यात टिळक फक्त एकाच ठिकाणी घसरलेले आढळून येतात. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी वैयक्तिक आणि सामाजिक भूमिकांची गल्लत केली. त्यांच्याविरोधात ‘ताई महाराज खटला’ चालू होता. या खटल्यात शाहू महाराजांनी टिळकांच्या विरुध्द बाजू घेतली होती. म्हणून टिळकांनी ‘वेदोक्त’वेळी शाहूंना विरोध केला. पण वैयक्तिक शाहू महाराजांच्या वेदोक्त अधिकाराला टिळकांनी विरोध केला नव्हता. छत्रपतींचे वंशज या नात्याने शाहूंचा तो अधिकार टिळकांना मान्यच होता. मतभेद दोन ठिकाणी झाले. शाहू म्हणायला लागले की सगळ्याच मराठ्यांना वेदोक्तचा अधिकार आहे. टिळकांनी हे म्हणणे अमान्य केले. या ठिकाणी समाजव्यवस्था म्हणून विचार केला तर टिळक स्थितिवादी होते; रॅडिकल नव्हते, हे कबूलच करायला हवे. वेदोक्त प्रकरणात विरोध केलेल्या राजवाड्यातल्या पुरोहितांची वतनेही शाहूंनी जप्त केली. या कृतीवरही ‘असा जुलूम करायचा नाही,’ असे टिळकांचे म्हणणे पडले. ते बरोबर नव्हते. 


>‘वेदोक्त’मुळे शाहू व टिळक यांच्यात कायमचा दुरावा आला? वैयक्तिक वादातून समाजाचे दूरगामी नुकसान होते आहे हे त्या दोन थोरांनी लक्षात घेतले नाही?
डॉ. मोरे :
या दोन महापुरुषांमधील दुराव्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. ब्राह्मण व ब्राह्मणेतर आणि खास करून ब्राह्मण व मराठा ही तेढ निर्माण झाली. माणूस जेव्हा कुठलीही कृती करतो त्या वेळी त्या कृतीचे सगळेच्या सगळे परिणाम लक्षात येतातच असे नाही. कितीही माणूस थोर असला तरीही. ‘येथ मोहवले गा कांतदर्शी,’ असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेच आहे. आपल्या कर्माचा परिणाम काय होईल, हे कुठल्याही माणसाला शंभर टक्के कळत नाही. छत्रपती शाहू व टिळक यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले असावे. 


> टिळकांना हिंदुत्ववादी ठरवून त्यांच्यावर ‘मुसलमानविरोधी’ असा शिक्का मारला जातो...
डॉ. मोरे :
एकोणीसशे साल उजाडण्यापूर्वी मुंबईत हिंदू-मुस्लिमांचे दंगे झाले होते. त्या वेळी टिळकांनी अग्रलेखांमधून स्वच्छपणे हिंदूंची बाजू घेतली होती. टिळक मुसलमानविरोधी, असा लोक प्रचार करतात, तो अत्यंत चुकीचा आहे. टिळकांचे म्हणणे व्यवहार्य होते. टिळकांचे म्हणणे की, मुसलमानांनी ब्रिटिश सरकारच्या कच्छपी लागू नये. ब्रिटिशांच्या पाठिंब्यावर मुसलमान जर दंडेली करत असतील तर तशी हिंदूही करू शकतात. म्हणून आपले प्रश्न आपण मिळून सोडवू. मग त्यांनी ब्रिटिशांना सुनावले, ‘मुसलमानांची चूक असेल तर त्यांना चाप लावा, हिंदूची असेल तर हिंदूनांही लावा.’ 

 

> ‘मंडालेनंतरचे आणि आधीचे टिळक’ हा फरक नेमका काय आहे?
डॉ. मोरे :
ही संकल्पना प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रथमत: मांडली. असा फरक करावा लागतो. तेवढाच का, इंग्लंडला जाण्यापूर्वीचे आणि इंग्लंडहून आल्यानंतरचे असाही फरक करावा लागतो. इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की स्वातंत्र्यलढा फक्त देशापुरता ठेवून चालणार नाही. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला हवा. त्यासाठी त्यांनी कम्युनिस्टांशी जुळवून घेतले. मंडालेतून टिळक परतल्यानंतर झालेल्या पहिल्या महायुद्धाने राजकारणाची परिमाणेच बदलली. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी पूर्ण काळ तत्त्वचिंतन केले. गीतारहस्यातल्या चातुर्वर्ण्याबाबत त्यांनी घेतलेली भूमिका याचे प्रतिबिंबच आहे. सगळ्याच समाजात कुठल्यातरी प्रकारची ‘डिव्हिजन आॅफ लेबर’ असते. व्यवस्था असतेच. मात्र ती सर्वकाळ चातुर्वर्ण्य व्यवस्थाच असली पाहिजे असे नाही, हे त्यांनी मान्य केले. 

 

> टिळकांचा ‘कर्मयोग’ काय होता?
डॉ. मोरे :
देशाबद्दलची निस्सीम प्रीती आणि क्लेश सहन करण्याची तयारी. वैयक्तिक क्लेश सहन करून, त्यागातून टिळकांनी देशाचा आदर कमावला; मागितला नाही. ‘निष्काम कर्मयोग’ हा गीततेला शब्द राजकीय जीवनात कोणी आचरणात आणला असेल तर तो टिळकांनीच. कर्मयोगी टिळकांनी देशाचे नेतृत्व केले. पण 1920 नंतर महाराष्ट्राचा एकही नेता राष्ट्राचे नेतृत्व करू शकला नाही, हे टिळकांचे अपयश नाही. टिळकांच्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्राची पीछेहाट झाली हे जसे एक कारण देशपातळीवर मराठी नेतृत्व न पोहोचण्याचे, तसेच व्यापक भूमिका घेण्यात ब्राह्मणांना आलेले अपयश हे दुसरे एक कारण. बहुजनांच्या आकांक्षांची वाढती क्षितिजे ब्राह्मणांना समजली नाहीत. ती टिळकांना कळली होती. गांधीजींना कळत होती. म्हणूनच गांधींजी म्हणाले, ‘भंग्याची मुलगी राष्ट्रपती होईल तेव्हा भारत खºया अर्थाने स्वतंत्र झाल्याचे मी समजेन.’ 

 

> शंभर वर्षांपूर्वीच्या ‘लोकमान्यां’कडून आजच्या पिढीने काय घ्यावे आणि काय घेऊ नये...
डॉ. मोरे :
प्रश्न अवघड आहे. टिळकांकडून काय घेऊ नये, असे नकारात्मक मी काही सांगणार नाही. कारण काही गोष्टी करण्यास व्यवस्था तुम्हाला भाग पाडते. जागतिक पातळीवरच्या नव्या अर्थव्यवस्थेचे भागीदार झाल्याने संयम नावाची गोष्ट पाळणे फार अवघड झाले आहे. पारतंत्र्य नसल्याने राष्ट्रभक्ती करायची म्हणजे काय, हे समजत नाही. निस्सीम राष्ट्रप्रेम, ध्येयाप्रती पूर्ण समर्पित भाव हा टिळक चरित्राचा गाभा होय. मोहांना बळी न पडणारा व सुखोपभोगांना दूर ठेवणारा टिळकांचा पराकोटीचा संयम घ्यायला हवा. टिळकांनंतर भारतीय पातळीवरच्या नेतृत्वासंदर्भात महाराष्ट्र मागे पडला. तो मुद्दा परत आणायचा असेल तर आदर्श टिळकच असू शकतात. स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून दिले टिळकांनी. तेच सूत्र पुढे गांधी-नेहरूंनी कळसावर नेले. टिळकांइतका भारत फिरलेला माणूस तेव्हा कोणीच नव्हता. शेजारी देशांमध्येही ते जाऊन आले. ब्राह्मणांनी बहुजनांसाठी त्याग केला पाहिजे, हे त्यांचे ब्राह्मणांना सांगणे होते. हिंदुस्थानच्या राजकारणात महाराष्ट्राने अग्रेसर राहावे, हे त्यांचे महाराष्ट्राला सांगणे होते. देशवासीयांकडून त्यांनी आदर कमावला होता; मागितला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...