आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वायफाय, पिंपरी चिंचवडमध्ये पाणी मोफत; दोन्‍ही पालीकांचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या पुण्यातल्या नागरिकांना २६ जानेवारीपासून वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पाणी मोफत मिळणार आहे. दोन्ही शहरांतील पालिकांनी हे निर्णय घेतले आहेत.  


प्रजासत्ताक दिनापासून पुण्यातल्या १५० ठिकाणी मोफत वायफाय सुविधा दिली जाणार असल्याची माहिती पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी दिली. नळजोडाला मीटर असलेल्या कुटुंबांना दरमहा ६ हजार लिटर पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. नि:शुल्क पिण्याचे पाणी देणारी पिंपरी-चिंचवड ही राज्यातली पहिलीच पालिका आहे.  


नि:शुल्क ५९ एमबी डाटा  
पुण्यातले प्रमुख रस्ते, रुग्णालये, महाविद्यालये, पोलिस ठाणी, उद्याने, महापालिकेची कार्यालये अशा एकूण दीडशे ठिकाणी फुकट वायफाय दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीला सुमारे ५० एमबी इंटरनेट (५१२ केबीपीएस स्पीडने) मोफत वापरता येईल. रेलटेल, एल अँड टी आणि गुगल यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होत आहे.  ‘पुणे वायफाय’ निवडल्यानंतर स्क्रीनवर मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. त्यानुसार मोबाइलधारकाला ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) मिळेल. हा ओटीपी टाइप करून इंटरनेट सुरू होईल. स्मार्ट एलेमेंट्स प्रकल्पांतर्गत पुणेकरांना मिळणाऱ्या ७ सुविधांमध्ये मोफत वायफायचा समावेश आहे.

 

कालांतराने पन्नास ठिकाणी मोफत वायफाय सुविधा दिली जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठ्यावरचा वार्षिक खर्च १०९ कोटी आहे. घरगुती पाणीवापराच्या पाणीपट्टीतून ३४ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २५ कोटींपर्यंतच वसुली होते. पाणीपुरवठ्यावरचा वार्षिक तोटा ८५ कोटींच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीमध्ये ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. तो स्थायी समितीने मान्य करत असताना प्रती कुटुंब ६ हजार लिटर पाणी नि:शुल्क देण्याचा निर्णय घेतला. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये आता ६ ते १५ हजार लिटरसाठी प्रती हजार लिटरमागे ८ रुपये, १५ ते २२.५० हजार लिटर वापरासाठी प्रती हजार लिटरमागे १२.५० रुपये, २२ ते ३० हजार लिटरसाठी प्रती हजार लिटरमागे २० रुपये पाणीपट्टी असेल. 

बातम्या आणखी आहेत...