आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- जनुकीय बदल (ट्रान्सजेनिक) घडवून तयार केलेले उसाची सात वाणे वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) प्रयोगशाळेत तयार आहेत. मात्र यासंदर्भात केंद्राचे धोरण नसल्याने अद्याप या वाणांच्या चाचण्या खुल्या शेतात घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे कमी पाण्यात अधिक काळ तग धरणारी, कीड-रोग प्रतिबंधक, अधिक साखर उतारा देऊ शकणारी यासारख्या विविध गुणधर्मांच्या अत्याधुनिक वाणांचे संशोधन रखडले आहे, अशी खंत ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केली.
जनुकीय बदल घडवलेली खाद्यान्न पिकांच्या वाणांचा वापर भारतात होऊ नये यासाठी काही स्वयंसेवी संस्था व पर्यावरणवाद्यांचा जोरदार प्रयत्न चालू आहे. या विरोधामुळेच देशी संशोधनातून पुढे आलेले मोहरीचे ट्रान्सजेनिक वाण अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. याशिवाय मका, वांगे, तांदूळ सोयाबीन आदी पिकांच्या ट्रान्सजेनिक वाणांच्याही व्यावसायिक लागवडींना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. सध्या भारतात केवळ बीटी कापूस या ट्रान्सजेनिक वाणाची लागवड चालू आहे.
देशमुख यांनी सांगितले, ‘जपानी कंपनीने संशोधन केलेल्या जनुकाचा वापर करून इंडोनेशियाने ट्रान्सजेनिक वाण तयार केले होते. तब्बल चार महिने पाणी मिळाले नाही तरी हे वाण हिरवेगार राहत असे. हे संशोधन भारतात आणण्यासाठी ‘व्हीएसआय’ प्रयत्नशील होती. त्यासाठी इंडोनेशिया, जपानला शास्त्रज्ञ पाठवण्यात आले. परंतु संबंधित जपानी कंपनीने या जनुकाचा वापर थांबवला असल्याचे सांगितल्याने यात पुढे प्रगती झाली नाही. दरम्यान, व्हीएसआयने स्वतःच ट्रान्सजेनिक वाणाच्या संशोधन हाती घेतले. यातून सात ट्रान्सजेनिक वाणे शेतकऱ्यांपुढे आणणे शक्य असल्याचे अभ्यासातून पुढे आले. कोइम्बतूरच्या संधोधन केंद्रानेही या दिशेने प्रयत्न केले असून ट्रान्सजेनिक वाण तयार केले.’
ट्रान्सजेनिक ऊस वाणांचे संशोधन पुढे जावे यासाठी ‘व्हीएसआय’ने केंद्राला दोन वेळा प्रस्ताव पाठवला हाेता. त्यास केंद्राने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतल्या संशोधनावर प्रत्यक्ष शेतात होणारे प्रयोग, चाचण्या रखडल्या आहेत. या वाणांची व्यावसायिक लागवड करून अभ्यास केल्याशिवाय संशोधन पूर्णत्वास जाऊ शकत नाही, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.