आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाच्या नोट्स फेटाळून लावण्यात हातखंडा : पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राजकीय कारकीर्दीत प्रशासनाने जारी केलेल्या नोट्स फेटाळून लावण्यात माझा हातखंडा आहे, अशा शब्दांत स्वत:मधील विशेष कौशल्याचा उल्लेख ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केला आणि सभागृहात हास्यस्फोट झाला.  निमित्त होते ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पाठ्यवृत्तीच्या संकल्प घोषणेचे..ग्रंथाली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभाग आणि अरुण साधू मित्रमंडळ यांच्या सहकार्याने या वर्षीपासून साधू यांच्या स्मृत्यर्थ सामाजिक-वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या युवा पत्रकाराला संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देण्यात येणार आहे.

 

या संकल्पाच्या घोषणेसाठी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.  खासदार कुमार केतकर, अरुण साधू, विद्यापीठ वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. साधू यांच्या स्मृतिदिनी २५ सप्टेंबरला या पाठ्यवृत्ती प्राप्त करणाऱ्यांचे नाव जाहीर केले जाईल, असे बर्वे म्हणाल्या. याप्रसंगी पवार यांनी साधू यांचे लेखन तसेच त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या गाजलेल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला.    
पवार म्हणाले, ‘साधू यांच्या कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटासाठी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल माझ्याकडे आले होते. मी मुख्यमंत्री होतो. चित्रपटातील काही प्रसंगांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, निवासस्थान, विधिमंडळ येथील काही प्रसंगांचे चित्रण आवश्यक होते. तशी परवानगी मागण्यासाठी दिग्दर्शकांनी मला विनंती केली. तेव्हा सामान्य प्रशासन विभागाने असे करू नये, हे सांगणारी पानभर नोट मला पाठवली होती, पण अशा नोटस ‘ओव्हररुल’ करण्यात माझा हातखंडा असल्याने मी चित्रीकरणासाठी परवानगी देऊन टाकली. त्यातून “सिंहासन’सारखी दर्जेदार चित्रकृती निर्माण झाली. प्रत्यक्षात या चित्रपटातून राजकीय व्यक्ती आणि राजकारण यावर थेट भाष्य करण्यात आले होते. पण चित्रपटाचा आशय लक्षात घेऊन मी प्रशासनाच्या नोट ओव्हररुल करून टाकल्या’.  

 

लेखन वास्तववादी, भिडणारे : पवार  
अरुण साधूंचे लेखन नेहमीच लक्षात राहील. अमरावतीसारख्या ठिकाणाहून आलेले साधू मुंबईकर होऊन गेले. इथल्या तळागाळातील लोकांच्या दु:खांशी ते समरस झाले. त्यांनी संवेदनशीलतेने जी मुंबई अनुभवली, ती शब्दांकित केली. ते वास्तव इतके भिडणारे होते, की त्यांच्या लेखनाचे अन्य भाषांतही अनुवाद झाले,अशा शब्दांत पवार यांनी साधूंच्या लेखनाचे गुणगान केले.   

 

बातम्या आणखी आहेत...