आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- कोणतीही नवी गोष्ट घडवायची असेल तर निधीच्या कमतरतेपेक्षा नव्या संकल्पना महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे पॉवर ऑफ बजेटऐवजी आधी पॉवर ऑफ आयडिया महत्त्वाची आहे, असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी तरुणाईला दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अन्य दहा संस्थांनी एकत्रितरीत्या डॉ. माशेलकर यांना अमृतमहोत्सवी सत्कार करत मानवंदना दिली. या सोहळ्यासाठी माशेलकर यांचे पीएचडीचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. शर्मा यांच्यासह कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत माशेलकर म्हणाले, “आमच्या पिढीने संशोधनाला सुरुवात केली तेव्हा तर संसाधनांची वानवाच होती. तरीही पॉवर ऑफ आयडियावर विश्वास ठेवत आम्ही काम सुरू ठेवले आणि तीन जणांनी रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवली. विज्ञान क्षेत्रात ठोस स्वरूपाचे दिशादर्शक संशोधन केले, तरच ही फेलोशिप मिळते. विज्ञानातील संशोधनात ज्ञानाप्रमाणेच वैज्ञानिक नैतिकताही महत्त्वाची असते, हे माझे गुरू डॉ. एम. एम. शर्मा यांनी शिकवले, असेही माशेलकर म्हणाले. तुम्हीही हे लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.
माशेलकर फेलोशिप
विद्यापीठातर्फे डॉ. माशेलकर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप फॉर सायन्स, ही फेलोशिप सुरू करण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी घोषित केले. विद्यापीठाला एमिनन्सचा दर्जा मिळावा, यासाठी अशा वीस फेलोशिप सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर विद्यापीठाची कामगिरी पाहता भारत सरकारने विद्यापीठाला आमंत्रित करून हा दर्जा द्यायला हवा, असे मत माशेलकर यांनी मांडले.
दिल की आवाज सुनो
जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी मी केवळ मेंदूचे ऐकले नाही तर हृदयाचा आवाज ऐकला. तुम्हीही लोक काय म्हणतात, याचा विचार न करता तुमच्या हृदयाची साद ऐका, असा गुरुमंत्र माशेलकर यांनी देताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हळदीचे पेटंट, पुण्यात आयसरच्या स्थापनेसाठी शंभर एकर जमीन देण्याचा निर्णय..मैंने दिल की आवाज सुनी, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.