आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिरसपूर्ण वातावरणात रंगला तुकोबांचा बीजसोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रीक्षेत्र देहूगाव येथे दाखल झालेल्या सुमारे अडीच लाख भाविकांच्या  उपस्थितीत, भक्तीरसपूर्ण वातावरणात जगद्गुरू तुकाराम महाराजांचा ३७० वा बीजसोहळा शनिवारी संपन्न झाला.

 

तुकोबांचे सदेह वैकुंठगमन प्रतीकात्मक रुपाने अनुभवण्यासाठी राज्यभरातून दिंड्या दाखल झाल्या होत्या. उन्हाच्या कडाक्याची पर्वा न करता लाखो भाविकांनी मध्यान्हीला  वैकुंठगमन सोहळा अनुभवला आणि ‘आम्ही जातो अमुच्या गावा..’ असे म्हणत तुकोबांना अभिवादन केले.  


तुकोबांच्या बीजसोहळ्याला  शनिवारी पहाटे तीनपासून प्रारंभ झाला. महापूजा बांधल्यावर देहू संस्थानचे विश्वस्त पंढरीनाथ मोरे, सुनील मोरे, जासिंदर मोरे, अशोक मोरे, अभिजीत मोरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शिळा मंदिरातही पारंपरिक महापूजा झाली. महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिर, शिळा मंदिर तसेच वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी सोडण्यास सुरुवात झाली. ही दर्शनबारी साडेदहापर्यंत अखंड सुरू होती. त्यानंतर टाळकरी, सनई, चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे,अब्दागिरी, जरीपटके यांच्यासह पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले.

 

नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी
ही पालखी भाविकांच्या साथीने साडेअकराच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारातील नांदुरकीच्या वृक्षापाशी  आली. परंपरेनुसार तुकोबांच्या वंशजांचे महानिर्वाण प्रसंगावरील कीर्तन झाले. दुपारी ठीक बारा वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी करून बीजसोहळा साजरा केला. त्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली. पुन्हा दर्शनबारी सुरू करण्यात आली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...