आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी औरंगाबादचा तरुण अटकेत, नालासोपारा शस्त्रसाठ्याच्या चौकशीतून धागेदोरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्या प्रकरणात सीबीआयने औरंगाबाद येथील कुंवारफल्ली भागात राहणाऱ्या सचिन अणदुरे यास अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई एटीएसने औरंगपुरा भागातून सचिनला नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर हत्येचे धागेदोरे सापडल्यानंतर सीबीआयने पुण्यात ही अटकेची कारवाई केली. डॉ. दाभोलकरांवर सचिननेच गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.


आठ दिवसांपूर्वी नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात सनातनचा साधक वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक झाली होती. वैभवच्या घरातून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, गावठी कट्टे, ते तयार करण्याची माहिती जप्त करण्यात आली होती.


जालन्यातून एका माजी नगरसेवकास उचलले
डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात औरंगाबादच्या एटीएसने जालन्यातून एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो दाेन वेळा निवडून आलेला माजी नगरसेवक असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी सकाळी महसूल कॉलनीत ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीच्या घराचीही पोलिसांनी कसून झडती घेतली. सध्या ही व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या कारवाईबाबत माहिती देण्याचे टाळले.

 

कळसकरच्या चौकशीतून आले सचिनचे नाव
शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला शरद कळसकर औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले होते. दरम्यान कळसकरनंतर १४ ऑगस्टला राजाबाजार भागातून एटीएसने सचिनला पकडले होते.

 

कळसकरशी होती त्याची मैत्री
शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत यांच्या जवळून संपर्कात असलेला दौलताबाद येथील शरद कळसकर याचा सचिन अणदुरे हा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. शरदला एटीएसने ताब्यात घेताच सचिनचे नाव समोर आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले होते. 

 

जप्त केलेल्या दुचाकीचा संदर्भ जुळला

काही वर्षांपूर्वी दाभोलकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी औरंगाबादची असल्याचे तपासात समोर आले होते. तेव्हा काही संशयितांची रेखाचित्रे जाहीर करण्यात आली होती. तेव्हाच सचिनची चौकशी झाली होती, अशी माहिती समोर येत आहे.

 

राजाबाजारमध्ये होते सचिनचे वास्तव्य
सचिन अणदुरे विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. एक मोठा भाऊ आहे. राजाबाजार कुंवारफल्ली भागातील तो रहिवासी आहे. सचिननेच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

 

सचिनच्या फेसबुक पोस्टवर होते लक्ष
एटीएसने सचिनच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले होते. त्याने अनेक हिंदुत्ववादी पोस्ट केल्या आहेत. तेव्हापासून एटीएसचे लक्ष होते. नऊ महिन्यांपूर्वीच तो कुंवारफल्ली परिसरात राहण्यास आला होता.

 

पाच वर्षांच्या सनदशीर लढ्यास यश
अंनिसचे राज्य सरचिटणीस मिलिंद देशमुख म्हणाले, पाच वर्षांपासून दर महिन्याच्या २० ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी त्यांची हत्या झाली त्या वि. रा. शिंदे पुलावर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. या नव्या अटकेमुळे लढ्यास पाच वर्षांनी का होईना काही प्रमाणात यश आले आहे.

 

सीबीआयने गुन्ह्याच्या मुळाशी जावे
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी औरंगाबादच्या एकास झालेली अटक ही महत्त्वपूर्ण घटना आहे. या प्रकरणात वीरेंद्रसिंग तावडे याच्यानंतर अडीच वर्षांनी ही दुसरी अटक आहे. सीबीआय गुन्हेगारांच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करेल, अशी अपेक्षा आहे.
- मुक्ता दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या

बातम्या आणखी आहेत...