आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याद्री डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस; महाबळेश्वरमध्ये 300 मिमी, पुढील 24 तास जाेर कायम राहणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या २४ तासांत वाढला आहे. जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे.  


महाबळेश्वरच्या डोंगरात गेल्या 24 तासांत तब्बल तीनशे मिलिमीटर तर लोणावळ्यात २८५ मिलिमीटर इतका तुफानी पाऊस कोसळला. हवामान खात्याने येत्या 24  तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  

 खडकवासला परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने धरण अाेव्हरफ्लो झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणातून सोमवारी सकाळपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता धरणातून ३ हजार ४३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पावसाचा विसर्ग सुरू झाला. दिवसभर पाऊस पडत राहिल्याने सायंकाळी सहा वाजता थेट १३ हजार ९८१ क्युसेक पाणी सोडले जाऊ लागले. रात्रभर पावसाची शक्यता असल्याने नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या पुणे मेट्रोचे कामदेखील मुठा नदी दुथडी वाहू लागल्याने ठप्प पडले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण साठ टक्के भरले आहे. शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. पुनावळ्याचा बंधारा अाेसंडून वाहू लागल्याने चिंचवड गावातल्या मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.  
 
काेकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी  
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. माथेरान, तळासरी, उल्हासनगर, मोखाडा, जव्हार यासह ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक अतिवृष्टी झाली. बेलापूर, मुरबाड, वाडा, कल्याण, विक्रमगड येथे प्रत्येकी दीडशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. याशिवाय पालघर, डहाणू, कणकवली, माणगाव, मुंबई, राजापूर, म्हसाळा, सावंतवाडी या कोकणपट्टीतल्या गावांमध्येही शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे.  
   
काेयनाचा साठा ७० टक्क्यांवर  
सह्याद्री डोंगररांगांजवळच्या कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातल्या परिसरातही गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला. सह्याद्री घाटमाथ्यावरच्या दावडी, ताम्हिणी, आंबोणे, वळवण या गावांना प्रत्येकी तब्बल अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपून काढले. वीजनिर्मितीसाठी महत्त्वाच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे कोयनेचा धरणसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...