आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अांदाेलनास हिंसेचे गालबोट: वाहने, पाेलिसांवर हल्ले; कलेक्टर कचेरीत ताेडफाेड, आचारसंहितेला फासला हरताळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अायाेजित करण्यात अालेल्या बंदला राज्याच्या बहुतांश भागात चांगला प्रतिसाद मिळाला. ‘पोलिसांना सुरक्षेसाठी सहकार्य करा, कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, असे वर्तन करू नका, हिंसाचार करू नका,’ अशी अाचारसंहिता सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी माेर्चेकऱ्यांसाठी जाहीर केली हाेती. मात्र पुणे, अाैरंगाबाद, लातूरसह राज्याच्या अनेक भागांतील अांदाेलकांनी  या आचारसंहितेला हरताळ फासला. पोलिसांवर दगडफेक, चप्पलफेक, सार्वजनिक वाहनांची मोडतोड, जिल्हाधिकारी कार्यालयातील मालमत्तेचे नुकसान असे प्रकार पुण्यात घडले. आंदोलन समाप्तीची घोषणा झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. १०० जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, बाहेरच्या लाेकांनी ही हिंसा घडवल्याचा अाराेप मराठा क्रांती माेर्चाचे राजेंद्र काेंढरे यांनी केला. बारामती, शिरूर, खेड, जुन्नर, मावळ, भोर आणि दौंड या तालुक्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात अाली हाेती.     

 

गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासूनच पुण्याच्या सर्व भागांतून गटागटाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने घोळके जमू लागले. ‘एक मराठा लाख मराठा,’ ‘शिवाजी महाराज की जय,’ ‘संभाजी महाराज की जय,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे,’ ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आदी घोषणा दिल्या जात होत्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोर्चाचे आयोजक जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यासाठी पुढे सरसावले. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातून खाली येऊन मोर्चासमोर निवेदन स्वीकारले पाहिजे, असा आग्रह धरत काहींनी हुल्लडबाजी सुरू केली. या गाेंधळाकडे दुर्लक्ष करत आयोजक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, विकास पासलकर, तुषार काकडे, दीपाली पाडळे आदींसह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. त्याच वेळी कार्यालयाबाहेरच्या दुसऱ्या गटाने जोरदार गाेंधळ सुरू केला. पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या, चप्पल-बूट आदींचा तुफान मारा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजाची ताेडफाेड करत काही आंदोलक आत घुसले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा, नामफलक, दिव्यांची तोडफोड केली गेली.      


‘निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलक शांतपणे माघारी जातील, असे वाटले होते. मात्र काही १८ ते २० वर्षांच्या मुलांनी  हल्ला करत गेट तोडले,’ असे जिल्हाधिकारी राम म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन संपल्याची घोषणा आयोजकांनी केली. मात्र त्यानंतरही काही तरुणांनी धुडगूस चालू ठेवला. पोलिस आणि पत्रकारांनाही या वेळी धक्काबुक्की झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बळाचा वापर करणे टाळल्याने वातावरण चिघळले नाही.     


तीस सायकली जाळल्या
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुण्यात सुरू करण्यात आलेल्या शेअर सायकल योजनेला आंदोलनाचा फटका बसला. भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत दुचाकी गाड्यांवरून फिरणाऱ्या तरुणांनी पौड रस्त्यावरील ३० सायकली जाळून टाकल्या. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनेक खासगी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. पौड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामालाही आंदोलकांनी सोडले नाही. येथील बुलडोझरची नासधूस करण्याचा प्रयत्न झाला.


आयोजकांना जुमानले नाही
संध्याकाळी पाचनंतर आंदोलन संपल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केली. मात्र त्यानंतरही शहराच्या अनेक भागातून दुचाक्यांवरून भगवे झेंडे घेऊन फिरणाऱ्या तरुणांच्या दहशतीमुळे दुकाने उघडू शकली नाहीत. काही भागातील जाळपोळ, ताेडफाेडीच्या घटनांमुळे भीती आणि तणावाचे वातावरण होते. डेक्कनच्या संभाजी पुतळ्याजवळ संध्याकाळी साडेसहानंतरही काहींनी रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे शिवाजीनगरकडून डेक्कनकडे व कोथरूड, सिंहगड रस्त्यावरून डेक्कन, शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांचे हाल झाले.


बाजार, शाळा, अायटी कंपन्या बंद     
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा-महाविद्यालयांना सुटी होती. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते आणि कामगार संघटनांनीही ‘बंद’ला पाठिंबा दिला होता. त्यामुळे गुलटेकडी येथील सर्व व्यवहार गुरुवारी ठप्प होते. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग यासह एरवी गजबजलेल्या सर्व बाजारपेठा, मॉलही बंद ठेवण्यात आले होते.  हिंजवडीतील बहुतांश आयटी कंपन्यांनी सुटी जाहीर केली होती. काही कंपन्यांनी तातडीच्या कामासाठी मोजक्या कर्मचाऱ्यांना सकाळी नऊच्या आतच कंपनीत हजर राहण्याची सूचना केली होती. 

 

हिंसेचे गालबोट     
>सकाळच्या वेळी पुण्यातील व्यापारी पेठांमध्ये उघडलेली दुकाने आंदोलकांनी बंद करायला लावली. लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या आंदोलकांनी पुणे महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांची तोडफोड केली.  
>चांदणी चौकात मराठा आंदोलकांनी प्रमुख रस्ते बंद केले होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून ठेवला होता. या वेळी पोलिसांवर दगडफेक झाली. या ठिकाणी हिंसक होणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.  
>डेक्कन परिसरात काही आंदोलकांनी उघड्या तलवारी नाचवल्याचा प्रकार घडला.   
>दुपारनंतर पुणे-नगर रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलवर आंदोलकांनी हल्ला चढवला. यात हॉटेलच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या प्रकारामुळे हॉटेल परिसरात घबराट निर्माण झाली होती.  
>पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ जमलेल्या आंदोलकांनी सुमारे पाच तास वाहतूक बंद पाडली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पुण्यातील आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...