आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune: पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत.. एमआयटी शाळेचा ‘फतवा’ मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या जाचक अटी गुरुवारी रद्द केल्या आहेत. यापुढे विद्यार्थ्यांची शालेय डायरी बनवताना शिक्षण विभागाशी चर्चा केली जाईल, असे संस्थेच्या विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड यांनी म्हटले आहे.  


शाळा प्रशासनाचा कोणत्याही विद्यार्थ्याला व्यक्तिगत किंवा सामूहिकरीत्या दुखावण्याचा हेतू नव्हता. त्यांना केंद्रबिंदू मानून यापुढील निर्णय घेण्यात येईल, असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावत यासंदर्भात चौकशी करू, असे सांगितले आहे. शाळेने विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत यासह अनेक अजब अटी घातल्या होत्या. 

 

शाळेने जारी केले निवेदन...

'शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याच हेतू नव्हता आणि नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करून संबंधित डायरी आणि सूचना मागे घेण्यात येत आहे.'

 

दरम्यान, शाळा सुरू होत असताना प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करत असते आणि त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी त्याचे अनुकरण करावे, असे सूचित करण्यात येते. मात्र, पुण्यातील एमआयटी शाळेने मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत, खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत, मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी, विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लॉस वापरू नये, सौंदर्य प्रसाधनांचा वापर नको, कानातील सोडून कोणतेही दागिने घालू नये, 0.3 सेंमीच्या आकारापेक्षा मोठे कानातील वापरू नये, त्यांचा रंग सोनेरी, चंदेरी किंवा काळा असावा, मुलांनी केस बारीक ठेवावेत, अंगावर टॅटू काढू नये, अन्यथा निलंबित केले जार्इल, पालकांनी आपसात बोलू नये, विद्यार्थी व पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करू नये, शाळेबाहेर प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये, असे बजावण्यात आले होते.

 

अटींचा भंग केल्यास भारतीय दंड विधान संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येर्इल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या असून त्यातील 25 जाचक अटी मान्य नसल्याचे सांगत पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर बुधवारी संताप व्यक्त केला होता. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालून शाळेवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

पालकांना बुधवारपर्यंत शाळेने घालून दिलेल्या अटींच्या पुस्तिकेवर सही आणणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले होते. त्यामुळे पालकांनी यावर आक्षेप घेत याबाबत शाळेला पालकांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकांना शाळेच्या गेटच्या आतमध्येच येऊ न दिल्याने त्यांनी शाळेच्या प्रशासनाविरोधात राग व्यक्त केला. याबाबत पालकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या एमआयटीच्या विश्वशांती गुरुकलअंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल व श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्वप्राथमिक शाळा बंद करून त्या जागी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसर्इ) सक्तीने विद्यार्थी व पालकांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यावर 59 पालकांच्या साक्षऱ्या आहेत.


शाळेने घातलेल्या अटी...
- मुलींनी नॅपकिन सॅनिटरी बॉक्समध्येच जमा करावे, अन्यथा 500 रुपये दंड आकारण्यात येर्इल.
- विद्यार्थ्यांनी वर्गात अन्नपदार्थ, पेपरचा कचरा केल्यास संबंधिताने ते साफ करावे.
- कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांचा कचरा साफ केल्यास अतिरिक्त दंड लावला जार्इल.
- शाळेने ठरवून दिलेला ड्रेसकोड वापरण्यात यावा.
- ठरावीक टेलरकडूनच ड्रेस शिवून घ्यावेत
- आधुनिक पद्धतीचे कपडे चालणार नाहीत
- सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात शाळेच्या परवानगीशिवाय सहभागी होऊ नये
- मुलींनी छेडछाड रोखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत
- खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत
- मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी
- विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लॉस वापरू नये.
- सौंदर्य प्रसाधनांचा वापर नको
- कानातील सोडून कोणतेही दागिने घालू नये
- मुलांनी केस बारीक ठेवावेत
- अंगावर टॅटू काढू नये.


मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न
मुलांना शाळेत शिस्त लागावी तसेच मुलींची छेडछाड रोखली जावी या उद्देशाने विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पालकांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांकडे जाण्यापेक्षा शाळा प्रशासनाकडे कोणत्या अटींबाबत विरोध आहे याची तक्रार दिली असती तर एक बैठक घेऊन हा विषय चर्चेने सोडवता आला असता. पालकांचा याबाबत गैरसमज झाला असून आम्ही त्यांची बैठक घेण्यासाठी तयार आहोत.
- सुचित्रा कराड, एमआयटीच्या विश्वस्त


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शाळेने डायरीमार्फत जाहीर केलेली नियमावली...

 

बातम्या आणखी आहेत...