Home | Maharashtra | Pune | Raj Thackerays Stand Maratha Reservation, Maharashtra government does not care for your life

सत्ताधारी- विरोधक तुम्हाला वापरून घेत आहेत, सतर्क राहा; पुन्हा ‘काकासाहेब शिंदे’ घडू नये- राज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 07:23 AM IST

“कौनसी जात के हो, हे ज्याने-त्याने विचारले पाहिजे असली परिस्थिती आणायची आहे का? महाराष्ट्राचा युपी-बिहार करायचाय काय?

 • Raj Thackerays Stand Maratha Reservation, Maharashtra government does not care for your life

  पुणे- “कौनसी जात के हो, हे ज्याने-त्याने विचारले पाहिजे असली परिस्थिती आणायची आहे का? महाराष्ट्राचा युपी-बिहार करायचाय काय? सत्तेत बसलेले आणि विरोधातील हे सगळेच तुम्हाला वापरून घेतात. सतर्क राहा. बेसावध राहू नका. या महाराष्ट्रात पुन्हा काकासाहेब शिंदे घडता कामा नये. सत्ताधारी- विरोधकांसाठी माझ्या महाराष्ट्रात पुन्हा कोणाचा जीव जाता कामा नये,” असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

  सरकारी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी आपण भांडतो आहोत. पण आरक्षणाच्या मुद्यावरची वस्तुस्थिती कोणीही सांगत नाहीत. आधीचे आणि आताचे सत्ताधारी तुमच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांना फक्त तुम्हाला खेळवायचे आहे. यातून तुमच्या हाती काहीच लागणार नाही ही गोष्ट शांतपणे समजून घेतली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान दोन आठवड्यांपूर्वी ज्या सभागृहात झाले त्याच ठिकाणी ठाकरेंची सभा झाली. मात्र, ठाकरेंच्या सभेला शहांच्या सभेच्या तुलनेत जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. यात तरुणांची संख्या सर्वाधिक होती.

  राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील स्थानिक मुलांना येथील शिक्षण आणि रोजगारात प्राधान्याने संधी दिल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. हाच मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. बाहेरची मुले येथे येतात आणि आपल्या मुलांच्या नोकऱ्या-शिक्षणातल्या जागा बळकवतात. माझा त्यांना विरोध नाही. पण आधी आमच्या मराठी मुलांचे भागवा. त्यातून जागा उरल्या तर त्या परप्रांतियांना द्या. पण असे घडत नाही. देशातील सर्वात प्रगत महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे येतात. मराठी मुलांना कोणी विचारत नाही. त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यांमधले घेतात. मराठी मुले वंचित राहतात.

  आरक्षणाच्या मागण्यांमुळे प्रत्येकजण एकमेकांकडे जातीच्या नजरेतून बघू लागला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. "लहान मुलेसुद्धा त्यांना कळत नसून जातींवरुन बोलू लागली आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्रावर ही वेळ आली. कुठे नेऊन ठेवायचा आहे महाराष्ट्र,' असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. सगळेजण खोटे बोलतात. मतांसाठी, निवडणुकीसाठी सगळे तुमचा वापर करून घेतात. पण तुमचे घर उभे राहण्यासाठी तुमच्या संसारासाठी कोणी काम करणार नाही. तुम्ही तुमचा विचार करा, असे ते म्हणाले.

  सर्वात घाणेरडा पंतप्रधान
  “आरक्षण द्यायचेच तर ते आर्थिक निकषांवर द्या. जातीच्या आधारावर नको, ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो आहे. एका जातीला आरक्षण दिले की दुसरी जात उभी राहते. यातून जातीजातीत द्वेष निर्माण होतो. व्ही. पी. सिंग यांच्या रुपाने देशाच्या इतिहासातील सर्वात घाणेरडा पंतप्रधान देशाला लाभला. त्याने मंडल आयोग आणून जातीपातींचे विष देशात कालवले. लोकांना माहितीही नव्हत्या इतकी जाती त्यानंतर सगळ्यांना माहिती झाल्या.”

  धर्म-जात उंबरठ्याच्या आत
  “प्रत्येकाने आपला धर्म घरात सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला काही सांगू नये.,” असे राज ठाकरे म्हणाले. गुजराती समाजाच्या पर्युषण पर्वाचा उल्लेख करुन त्यांनी सांगितले, “कत्तलखाने बंद करण्याचे फतवे काढणे बंद करा. गटारीला आम्ही सांगतो का, ‘घे. कंपलसरी आहे.’ ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा. मुसलमानांना नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर? कोणाला कळवायचे असते? नमाज घरात पढावा. रस्ते का अडवता? प्रत्येकाने हे सांभाळले तर देशाला चिंता करावी लागणार नाही. अन्यथा एकाने चूक केली की सगळे करतात.”

Trending