आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर; मुंबईच्या दूध कोंडीसाठी राजू शेट्टी गुजरात सीमेकडे रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधाला तीन रुपये वाढीव दर किंवा अनुदान मिळण्यासाठी अांदाेलन पुकारलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दुधाचा अभिषेक घालून गुजरात सीमेकडे प्रयाण केले. मुंबईची दूधकोंडी करण्यासाठी गुजरात सीमेवरून येणारे दूध रोखण्यासाठी शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या महामार्गांकडे कूच केली. पुणे आणि मुंबई शहरात पुरेसा दूध साठा असल्याने आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तुटवडा जाणवला नाही.  


तत्पूर्वी, ‘स्वाभिमानी’ने  रविवारी रात्री बारानंतर दूध विक्री बंद आंदोलन सुरू केले.  पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसक पद्धतीने बळजोरी करून दुधाची वाहतूक रोखण्यात आली. दूध टँकरवर दगडफेक करत दूध पुरवठा रोखला. टँकरच्या काचा फोडून, टायरमधली हवा सोडून अडवण्यात आले. त्यानंतर टँकरमधले दूध रस्त्यावर सोडून देण्याचे प्रकार पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात सर्रास घडले. दरम्यान, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे बारा टँकर पोलिस संरक्षणात मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.  


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरच्या काचा येवलेवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे रविवारी रात्री फोडण्यात आल्या. दगडफेक करून टँकर अडवल्यानंतर टँकरमधील दूध रस्त्यावर सोडण्यात आले. पुण्यात सोमवारी पहाटे सोनई, कृष्णाई, माउली, क्रांती, मातोश्री या खासगी दूध संघांची दूध वाहतूक बळजबरीने अडवण्यात आली. या दूध संघांच्या गाड्यांवर हल्ले करत दुधाची नासधूस करण्यात आली.   बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुण्यात सरकारविराेधात निदर्शने केली.


अाज तीव्रता वाढणार
राजू शेट्टींचे हे अांदाेलन साेमवारपासून सुरू झाले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी ते अाणखी तीव्र हाेण्याची शक्यता अाहे. गुजरातमधून मुंबईकडे येणारे दूध टँकर राेखण्यासाठी स्वत: शेट्टी पालघरच्या दिशेने रवाना झाले अाहेत.


मुख्यमंत्री घेणार बैठक
विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांत दूध दरप्रश्नी विराेधकांनी सरकारला जाब विचारला. दूध उत्पादकांना थेट अनुदान देण्याची मागणी मात्र सरकारने मान्य केली नाही.  मंगळवारी विधानसभा अध्यक्ष व गटनेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री या विषयावर बैठक घेणार अाहेत.


सांगाेल्यात नऊ लाख लिटर दूधाचे व्यवहार ठप्प; माेफत दुधाचे वाटप
सांगोला तालुक्यातील सुमारे नऊ लाख लिटर दूध खासगी व सहकारी संस्थांनी संकलन बंद केल्याने विकता आले नाही. त्यामुळे काहीनी ते रस्त्यावर ओतून   दिले तर काहीनी मोफत दिले. काहींनी चार ते पाच रुपये प्रतिलिटर दराने विकले. मोफत दूध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काहींनी टेम्पोने ग्रामीण भागातून दूध आणून सांगोला शहरात सोलापूर- कोल्हापूर हायवेवर मोफत वाटले. हॅटसन या संस्थेने दोन दिवसांपासून दुध संकलन बंद केल्याने तीन लाख लिटर दूध त्यांनी विकत घेतले नाही. जिल्हा दूध संघ दररोज बाराशे लिटर दूध संकलन करते त्यांचा दर १७ रुपये आहे. त्यांनीही दोन दिवसांपासून संकलन केले नसल्याचे संचालक विजय येलपले यांनी सांगितले महीम, महुद, कडलास, घेरडी, नजरा भागातील शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले तर काही मोफत वाटले. 


नाशिकमधून २९ दुधाचे टँकर चोख पाेलिस बंदाेबस्तात मुंबईकडे रवाना
राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद अांदाेलन पुकारले असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत असले तरी नाशिकमधून अांदाेलनाच्या पहिल्याच दिवशी २९ दूध टँकर पाेलिस बंदाेबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात अाल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. दूध संघांना अावश्यकता भासल्यास त्यांना पाेलिस संरक्षण देण्याची तयारीही प्रशासनाने केली असल्याची माहिती त्यांनी दिली.  दरम्यान, कसारा घाटात पोलीस संरक्षणामध्ये दुधाचा जाणारा टंँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविण्याच्या प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अांदाेलकांना ताब्यात घेत टँकर पुढे मंुबईकडे रवाना केला. घोटी येथे आंदोलन करुन मुंबईचा दुध पुरवठा बंद करण्याची रणनिती अांदाेलकांनी आखली होती. मात्र सोमवारी जोरदार पावसामुळे आंदोलनाची हवा गुल झाली.


शेट्टींकडून शांततेचे अावाहन  
खासदार शेट्टी म्हणाले, ‘अहिंसेच्या मार्गाने गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून दूध संकलन बंद ठेवा. शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन दुधाची वाहतूक अडवावी. सरकारला दूध पाहिजे असल्यास आमच्या अंगावर टँकर घाला व दुधाचा टँकर घेऊन जावे, अशा पद्धतीने आंदोलन करावे.’


आजपासून दूध तुटवडा  
‘बळाचा वापर करून सरकारला ‘स्वाभिमानी’चे आंदोलन चिरडून टाकायचे आहे. परराज्यातून दूध आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही तो हाणून पाडू. मंगळवारपासून मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये दूध तुटवडा जाणवू लागेल’, असा दावा खासदार राजू शेट्टी यांनी केला.


वाशीममध्ये दुधाचे टँकर जाळले, सुदैवाने चालक बचावला
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे साेमवारी अांदाेलनाला हिंसक वळण लागले. स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध वाहून नेणाऱ्या  राजहंस कंपनीच्या टँकरला  आग लावली. आधी ट्रकचालक आग लागली तरी गाडीतच बसून होता. मालेगाव-औरंगाबाद महामार्गावर या घटनेमुळे काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. इतर टँकरचालक आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. टँकरचे मोठे नुकसान झाले असून वेळीच खाली उडी घेतल्याने टँकरचालक थोडक्यात बचावला.

 

पुढील स्लाइड‌्सवर पाहा... स्‍वाभिमानी कार्यकर्त्‍यांनी दुधाच्‍या टॅंकरला लावलेली आग तसेच आंदोलनाचे फोटोज... 

 

हेही वाचा, 
दुधाचे अनुदान थेट खात्यावर देता येणार नाही: मुख्यमंत्री, 60% दूध व्यवसाय खासगी संस्थांच्या ताब्यात

बातम्या आणखी आहेत...