आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंची वाढवण्यासाठी पुण्यात बंगल्यालाच लावला जॅक; बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनक तंत्रज्ञानाचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाहतूक पोलिस अनेकदा चुकीच्या ठिकाणी लावलेल्या चारचाकींना जॅक लावतात किंवा टायर बदलण्यासाठी वाहनांना जॅक लावला जातो, पण मंगळवारी पुण्यात एक बंगलाच जॅक लावून अपलिफ्ट करण्यात आला. दोन हजार स्क्वेअर फूट बंगल्याचे अपलिफ्टिंग करण्यासाठी तब्बल अडीचशे जॅक लावण्यात आले.  


घोरपडीतील तारादत्त कॉलनीतील शिवकुमार अय्यर यांचा भारद्वाज बंगला आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत विकासकामे, रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. परिणामी बंगला सखल स्थानी आला आणि रस्त्यावरील सर्व कचरा, सांडपाणी, चिखल थेट बंगल्यात येऊ लागला. अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत बादल्यांनी पाणी उपसण्याची वेळ अय्यर कुटुंबावर आली. त्यामुळे यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात अय्यर कुटुंब होते. त्यांनी इंटरनेटवर बिल्डिंग अपलिफ्टिंगची माहिती वाचली आणि हरियाणातील कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या प्रतिनिधीने पुण्यात येऊन बंगल्याची पाहणी केली आणि अपलिफ्टिंगचे तंत्र बंगल्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.    


अशी होती प्रक्रिया   
कंपनीच्या प्रतिनिधीने बंगल्याच्या मूळ आराखड्याचा अभ्यास केला. त्यानंतर बंगल्याच्या सर्व दिशांनी दोन फूट खोदकाम करून घराच्या पायामध्ये अडीचशे जॅक फिट करण्यात आले. स्क्रूचा वापर करून जॅकच्या माध्यमातून संपूर्ण बंगला एकाच वेळी चार फूट उचलण्यात आला. मधल्या पोकळीत सिमेंट-विटा भरून पाया पक्का केला जाणार आहे. त्यामुळे सखल जागी उंची वाढणार आहे. हे काम पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे. बंगल्याला कोणताही धोका नसल्याचे कंपनीने सांगितले.


तंत्रज्ञान कमी खर्चाचे   
बिल्डिंग अपलिफ्टिंग तंत्रज्ञान कमी खर्चाचे आणि वेळेची बचत करणारे आहे. अनेकदा वेगवेगळ्या  कारणांनी इमारती खचतात, कलंडतात, इतर ठिकाणांपेक्षा सखल स्थानी जातात. अशा वेळी संपूर्ण इमारत पाडून नवी उभारणे अतिशय खर्चिक आणि वेळ घेणारे ठरते. याला पर्याय म्हणून अपलिफ्टिंग तंत्रज्ञान विकसित झाले. विदेशात या पद्धतीने बिल्डिंग शिफ्टिंगही केले जाते.   

बातम्या आणखी आहेत...