आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसंगी वाईटपणाही घेऊ, पण नेत्यांच्या कामाचेही मूल्यमापन करणार : जयंत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -‘१९९५- ९९’ या काळात मी आणि अजितदादा विरोधी पक्षात होतो. त्या वेळी मी साखर संघाचा तर दादा राज्य बँकेचे अध्यक्ष होते. त्या वेळी आम्ही राज्यभर फिरलो आणि नंतर आमची सत्ता आली. मी दादांना आठवण करून देऊ इच्छितो की माझा ‘पायगुण’ चांगला आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी दिवस आपलेच असल्याचा आशावाद व्यक्त केला. अापण बूथ कमिट्यांवर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  


‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड पक्षाच्या सर्वसाधारण सभेत रविवारी पुण्यात करण्यात आली. या निवडीनंतर पाटील यांनी सभेला संबोधित केले.  मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांचे नाव सुचवले. धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांनी पाटील अनुमोदन दिले. त्यानंतर पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी दिलीप वळसे-पाटील यांनी घोषित केले. नवाब मलिक (उपाध्यक्ष), हेमंत टकले (खजिनदार), शिवाजीराव गर्जे (सरचिटणीस) याही निवडी बिनविरोध झाल्या.  


पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय महासचिव डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, अण्णा डांगे अादी उपस्थित होते. निवडीनंतर जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यातल्या ९१ हजार ५००  निवडणूक बूथकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पुढच्या चार-पाच महिन्यांत प्रत्येक बूथवर कमिट्या करण्याचे आपले उद्दिष्ट असेल. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन पक्षात झाले पाहिजे. त्यासाठी वाईटपणा घेण्याची माझी तयारी असेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.  


नावातच जय : धनंजय मुंडे


विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ‘नूतन प्रदेशाध्यक्षांच्या नावातच ‘जय’ आहे. त्यामुळे ते पक्षालाही जय मिळवून देतील आणि त्याला कधीही ‘अंत’ नसेल. येत्या निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’ राज्यातला क्रमांक एकचा पक्ष बनावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर जयंत पाटील हे जोरदार बॅटिंग करणाऱ्या रोहित शर्माप्रमाणे आहेत. आपल्या फिरकीने विधानसभेत ते सत्ताधाऱ्यांना नामोहरम करतात. आता त्यांनी ‘वाट्टेल ते’ करावे आणि २०१९ मध्ये पक्षाला विजयी करावे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, या संबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...