आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अाजपासून रंगणार मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा पडदा बुधवारी मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात उघडणार आहे. नाट्यप्रेमी आणि रंगकर्मींच्या स्वागतासाठी महाकवी कालिदास नाट्यमंदिराचा परिसर सज्ज झाला आहे. बुधवारी साडेचार वाजता रंगतदार नाट्यदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. सायंकाळी साडेसहा वाजता कालिदास नाट्यमंदिराच्या सुधा करमरकर रंगमंचावर नाट्यसंमेलनाच्या औपचारिक उद््घाटनाचा सोहळा रंगणार आहे.   

 
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी नाट्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना ही माहिती दिली. ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते ९८ व्या नाट्यसंमेलनाचे उद््घाटन होणार आहे. मावळते नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि नियोजित संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती या वेळी असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद््घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील, असे कांबळी म्हणाले. या सर्वांच्या स्वागतासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे स्वागताध्यक्ष या नात्याने उपस्थित असतील.   

 
उत्तरार्धात रंगणार सौभद्र    
नाट्यसंमेलनाच्या औपचारिक उद््घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर रसिकांना “संगीत सौभद्र’ या नाटकाची मेजवानी मिळणार आहे. तसेच उत्तररात्री पंचरंगी पठ्ठे बापूराव हा विशेष कार्यक्रम आणि ज्येष्ठ लावणी कलावती यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृतींना समर्पित असा “रंगबाजी’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. १४ जूनच्या  “स्वर’ या विशेष मैफलीत राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. 

  
दुर्मिळ चित्रफितींचा ठेवा    
मराठी रंगभूमीचा इतिहास घडवणाऱ्या रंगकर्मींचे योगदान सांगणारा दुर्मिळ चित्रफितींचा ठेवा नाट्यसंमेलनात रसिकांना पाहता येणार आहे.  सुमारे २४ बुजुर्गांचा त्यात समावेश आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी त्यासाठी चित्रफिती तयार केल्या आहेत. 

 

नाट्यदिंडीत ४०० कलावंत   
९८ व्या नाट्यसंमेलनाची नाट्यदिंडी झोकात निघणार, अशी चिन्हे आहेत. सुमारे ४०० लोककलावंतांचा सहभाग नाट्यदिंडीत असेल, असे प्रसाद कांबळे म्हणाले. संकल्पना सुभाष नकाशे यांची आहे.  मुलुंड रेल्वेस्टेशन - एम. जी. रोड - पाच रस्ता ते महाकवी कालिदास नाट्यगृह या मार्गाने नाट्यदिंडी प्रवास करेल. अर्थात पावसाच्या मर्जीवर बरेच काही अवलंबून राहील. पाऊस खूप असल्यास दिंडीचा मार्ग छोटेखानी राहील.    

 

 

बातम्या आणखी आहेत...