आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा आसूड पुन्हा एकदा कडाडणार, सरकारविरोधात 1 जूनला आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने अखिल भारतीय किसान सभेने येत्या १ जूनला पुन्हा राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.  किसान सभेने मार्च महिन्यात ‘नाशिक ते मुंबई’ काढलेल्या मोर्चाची सरकारने दखल घेत मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, दीड महिना होऊनही मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही, असा सभेचा आरोप आहे.


शिवाय, गेल्या वर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत असल्यामुळे यंदाच्या १ जूनच्या आंदोलनाची घोषणा करण्यात आल्याचे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले. किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. सभेचे कार्यकर्ते डॉ. अजित नवले, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अजित अभ्यंकर, बाबा नवले आदी या वेळी उपस्थित होते. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी, स्वस्त दराने  बियाणे उपलब्ध करणे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, कष्टकरी-शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन आदी आमच्या मागण्या आहेत. या संदर्भात समिती स्थापन करून दीड महिन्यात अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारने म्हटले होते. प्रत्यक्षात कार्यवाही दिसत नसल्याचे डॉ. नवले म्हणाले.  


यापुढे गिरीश महाजन उपयोगात येणार नाहीत  : आश्वासने देऊन बोळवण करण्याची सरकारची भूमिका आहे. आंदोलन मिटवण्यात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात गेल्या महिनाभरात संपर्क साधून आश्वासनांची विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यापुढे महाजन फायर ब्रिगेड म्हणून उपयोगात येणार नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.

 

देशव्यापी आंदोलन  
शेतकरी समस्यांबद्दल केंद्र सरकारलाही जागे करण्याची भूमिका किसान सभेने घेतली आहे. यासाठी देशभर मोहीम राबवून १० कोटी स्वाक्षऱ्या पंतप्रधानांना पाठवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातून वीस लाख स्वाक्षऱ्या गोळा केल्या जाणार आहेत. त्यानंतर देशव्यापी शेतकरी लढ्याची घोषणा किसान सभेतर्फे केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...