आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र..साखर उद्योगातील अडचणींवर सुचवल्या उपाययोजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काॅग्रेंसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी यंदा अतिरिक्त झालेल्या ऊस उत्पादन आणि दराबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पत्रात उद्योगाशी संबंधित इतर समस्यांबाबत व ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच, त्यावर योग्य उपाययोजनाही सुचवल्या आहेत.  

 

या पत्रात शरद पवार यांनी केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 8500 कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले होते त्याविषयीचा विरोधाभास नमूद केला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोतर्फे जाहीर केलेल्या पत्रात मात्र हीच रक्कम 7000 कोटी रूपये अशी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात निव्वळ आर्थिक खर्च रूपये 4047 कोटी असताना, पॅकेजमध्ये जाहीर केलेले 8500 कोटी अथवा 7000 कोटी हे दोन्ही आकडे सरकारकडून फुगवून सांगण्यात येत असल्याचे शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे. 

 

इथेनॉलच्या क्षमतेच्या वाढीसाठी व्याज सवलतीची योजना तयार करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. या विशिष्ट निर्णयामुळे दोन वर्षांच्या अतिरिक्त साखर उपलब्धतेमुळे उद्भवणाऱ्या अडचणींमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार नाही. मात्र ही योजना पुढील पाच वर्षांमध्ये ऊर्ध्वपातन क्षमता वाढविण्यास प्रोत्साहित करेल असेही त्यांनी म्हटले आहे. इथेनॉलची निर्मिती आणि वापर वाढवण्यासाठी इथेनॉलची किंमत किमान 53 रूपये प्रति लिटर असावी अशीही सूचना त्यात केली आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रूड ऑईलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभुमीवर आणि इथेनॉलवरील 18 टक्के जीएसटी कमी करण्याने बाकीची अधिक रक्कम इथेनॉलच्या सध्याच्या मूलभूत किंमतीत (40.85 रुपये प्रति लिटर) वाढ करण्यासाठी वापरता येईल, असे त्यांनी सुचवले आहे.

साखर उत्पादनाची सरासरी किंमत देशभरात साधारण 34 ते 36रूपये असताना, साखरेची किमान विक्री किंमत 29 रूपये प्रति किलो ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटत नाही असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. भौगोलिकदृष्ट्या पोषक असलेल्या उत्तर भारतात दर्जेदार साखरची निर्मिती होते तर इतर भागात साखरेचा दर्जा वेगळा असल्याने हा फरक लक्षात घेऊन सरकारने किमान विक्री किंमतीबाबत दोन वेगवेगळे पर्याय ठेवावेत, अशीही सूचना पत्रात करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...