आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NDA चे कॅडेट्स हे देशातील तरुणांचे आदर्श, सशस्त्र सेना ही सर्वोत्कृष्टता आणि समर्पणाचे प्रतिक- राष्ट्रपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कॅडेट्सनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या 'सेवा परमो धर्म' या ब्रीद वाक्याचा कधीही विसर पडून देवू नये. NDA चे कॅडेट्स हे देशातील युवकांचे आदर्श आहेत, त्यामुळे त्यांनी मानवतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. एनडीएच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज पुण्याच्या खडकवासलामधील खेत्रपाल ग्राऊंडवर पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

134 व्या कोर्समध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन अक्षत राज हा सुवर्ण पदकाचा (प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल) मानकरी ठरला. तर अकॅडमी कॅडेट कॅप्टन मोहम्मद सोहेल अस्लमला रौप्य पदकाने (प्रेसिडेन्ट्स सिल्व्हर मेडल) तसेच स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन अली अहमद चौधरीला कांस्य पदक (प्रेसिडेंटस ब्राँझ मेडल) मिळाले. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


राष्ट्रपती म्हणाले, तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. या यशात तुमच्या आई वडिलांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठीणातील कठीण आव्हानासाठी सज्ज करत असते. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. सशस्त्र सेना ही सर्वोत्कृष्टता आणि समर्पणाचे प्रतिक आहे. येत्या आव्हानाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोण हाच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू कराल, अशावेळी एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावण्यासाठी सदैव तयार रहा. सशस्त्र दलांचा सर्वोच्च कमांडर म्हणून, हा क्षण माझ्यासाठी खूप समाधानाचा असल्याचे त्यांनी सांगितले. 60 पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या आणि देशासाठी उत्तमोत्तम अधिकारी दिलेल्या एनडीए सारख्या संस्थेमधून पदवी प्राप्त करणे ही स्नातकांसाठी अभिमान बाळगावा अशीच गोष्ट आहे. कोणत्याही दलातील गणवेशधारी सैनिक हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असतो, सैनिकांना प्रत्येक ठिकाणी सन्मानच मिळत असतो. ते पुढे म्हणाले, देशाच्या सीमा सुरक्षित करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही सैनिकांचे काम अव्दितीय असते. सैनिक केवळ शत्रूंशीच सामना करत नाहीत, तर सियाचीन, लद्दाख सारख्या ठिकाणी निसर्गाशीही सैनिकांना सामना करावा लागतो. सर्व आपत्तींशी सामना करत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी चेतक हेलिकॉप्टरने ध्वज सलामी देण्यात आली. सुखोई विमानांच्या तुकडीने आकाशात नयनरम्य प्रात्यक्षिके केली. यावेळी एनडीएचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. बिपीन, डेप्युटी कमांडन्ट एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, यांच्यासह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, छात्रसैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...