आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व शाळा नेट, वायफायच्या कक्षेत; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिक्षण क्षेत्रात डिजिटल माध्यमाचा चांगला वापर होत आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. हा वापर वाढण्यासाठी राज्यातील सर्व शाळा इंटरनेट व वायफायने जोडल्या जाणार आहेत,' अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या 'दीक्षा' या अॅपवरील 'महाराष्ट्र इन-सर्व्हिस टीचर्स रिसोर्स अॅप'(मित्र २.०) हे मोबाइल अॅप तावडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे. 


तावडे म्हणाले, मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य शिक्षण सहज मिळू शकते. पूर्वी शिक्षकांना वर्गात मोबाइल नेण्यास बंदी होती. मात्र, आता परवानगी दिल्यानंतर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर अॅप तयार केली. शासनाने कोणताही निधी न देता शिक्षकांनी स्वखर्चाने, ज्ञानाआधारे अॅप विकसित केले. राज्यातील शिक्षकांनी १० हजारांहून अधिक अॅप विकसित केले. आज राज्यातील १ लाख ६० हजारांहून अधिक शिक्षक तंत्रस्नेही आहेत. डिजिटल शाळांसाठी शिक्षकांनी सुमारे ३८० कोटींचा निधी जमवला. 


वेतनवाढीसाठी संशोधन नको 
यावेळी शिक्षकाने महाविद्यालयांच्या धर्तीवर शाळांतील शिक्षकांनी पीएचडी केल्यास त्यांचे वेतन वाढवण्याची मागणी केली असता तावडे म्हणाले, 'वेतनवाढीसाठी संशोधन करण्यात अर्थ नाही. वेतन व संशोधन स्वतंत्र गोष्टी आहेत. संशोधनाची दखल कशा पद्धतीने घेता येईल याचा विचार होईल,' 


मराठीच्या आग्रहाचा विसर 
सर्व सरकारी कामकाजात मराठीचा वापर करण्यात यावा असा सरकारचा अध्यादेश आहे. मात्र, मित्र २.० अॅपच्या कार्यक्रमाचे शासकीय टिपण मात्र इंग्रजीतून देण्यात आले. त्यामुळे सरकारला मराठीच्या आग्रहाचा विसर पडल्याचे दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...