आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये नवे पोलिस आयुक्तालय, नवीन 2633 पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - पिंपरी-चिंचवड व परिसरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळास बैठकीत मंजुरी देण्यात अाली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या २ हजार ६३३ नवीन पदांच्या निर्मितीसही मंजुरी मिळाली.   


पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण संस्था, वाहने यामध्ये वाढ होत असल्याने सध्याच्या यंत्रणेवर ताण येत होता. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक परिणामकारकपणे राखता यावी म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे.  


पोलिस आयुक्त आणि अप्पर पोलिस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राहणाऱ्या या नवीन पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन परिमंडळे आणि एकूण १५ पोलिस ठाणी समाविष्ट होणार आहेत. नवीन आयुक्तालयासाठी एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरून २ हजार २०७  पदे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदांची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यापैकी पहिल्या टप्प्यात १ हजार ५६८, दुसऱ्या टप्प्यात ५५२, तर तिसऱ्या टप्प्यात ५१३ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 

या आयुक्तालयाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चासदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे पिंपरी- चिंचवडच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे नव्याने नोकर भरती होणार असल्याने बेरोजगार तरुणांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...