आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे संमेलनाध्यक्षपदाची प्रतिष्ठा रसातळाला; थेट निवडीचा निर्णय याेग्यच, अाता नेमाडेंनाच द्यावा मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा फार्स इतकी वर्षे केला जात होता. तो बंद केल्याबद्दल साहित्य महामंडळाचे अभिनंदन केले पाहिजे. ज्ञानपीठ मिळवणारे भालचंद्र नेमाडे यांनाच आगामी संमेलनाध्यपदाचा मान द्यावा व महामंडळाने स्वत:ला विभूषित करावे', अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली. निवडणुका बंद केल्याने सुमारांची सद्दी संपेल, याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. 


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी निवडणूक न घेता सन्मानाने ज्येष्ठ लेखकाला अध्यक्षपदाचा मान देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर 'दिव्य मराठी'ने याबाबत प्रा. पठारे यांचे मत जाणून घेतले. ते म्हणाले, 'निवडणुका घेऊन या पदाची प्रतिष्ठा पार रसातळाला गेली होती. उशीर झाला असला तरी सध्याच्या कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. हा एक शहाणा व स्तुत्य निर्णय आहे, असे मी म्हणेन. यापुढे जाऊन साहित्य महामंडळाने मराठी भाषेतील ज्ञानपीठ सन्मानप्राप्त एकमेव हयात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाच आग्रहपूर्वक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करावी. तो मान नि:संशय नेमाडे यांचा आहे. नेमाडे यांना अध्यक्ष करून महामंडळाने आपली आणि संस्थेची तसेच संमेलनाची प्रतिष्ठा वाढवावी, असे माझे मत आहे.' 


अाता प्रतिभावंतांना न्याय मिळेल

महानाेर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनीही निर्णयाचे स्वागत केले. 'मी स्वत: मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष असताना प्रत्येक वेळी निवडणूक नको, निवड करा, ही भूमिका आग्रहाने मांडत आलो आहे. त्यामुळेच मी अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. निवडणूक पद्धत अत्यंत लाजिरवाणी, भीकमांगू स्वरूपाची आहे. प्रसंगी निवडणुकीचा ताण लेखकांच्या जिवावर बेततो, हेही अनेकदा सिद्ध झाले. राजकारण्यांनाही जमणार नाही, असे राजकारण या निवडणुकीत केले जाते, हेही सर्वश्रुत आहे. इंदिरा संत, बा. भ. बोरकर अशा अनेकांचे पराभव ही विषण्ण करणारी गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाचा निर्णय प्रतिभावंतांना न्याय देणारा ठरेल.' 


हे दिग्गज भावी संमेलनाध्यक्ष 
भालचंद्र नेमाडे  प्रा. रंगनाथ पठारे  श्याम मनोहर  चंद्रकांत पाटील  डॉ. अरुणा ढेरे  मंगला गोडबोले  महेश एलकुंचवार  आशा बगे  डॉ. अनिल अवचट  डॉ. नरेंद्र चपळगावकर  ना. धों. महानोर  रावसाहेब कसबे  रा. रं. बोराडे 


खुल्या मनाने स्वागत : गोडबोले
'निर्णय चांगला व स्वागतार्ह आहे. अध्यक्षांची निवड महामंडळ करणार असेल तर त्यांनी निवडलेल्या अध्यक्षांचे खुल्या मनाने स्वागत करावे, हाच लेखक का निवडला, असे प्रश्न करू नयेत, अस्मिता, प्रादेशिकता, विशिष्ट लेखनप्रकार...यांच्या पलीकडे जाऊन मोकळेपणाने निर्णय स्वीकारावा,' अशी भावना प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.

 
निर्णयामुळे ज्येष्ठ लेखकांचा मार्ग मोकळा
कसबे महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत. मसापने या निर्णयासाठी सदैव पाठपुरावा केला होता. अखेरीस तसा ठराव करून घेण्यात कार्यकारी मंडळ यशस्वी ठरले व या निर्णयामुळे ज्येष्ठ लेखकांचा, ठसा उमटवणारे लेखन करणाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला, अशी माझी भावना आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. 

 

बातम्या आणखी आहेत...