आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानासंदर्भातल्या मूळ सनदेच्या अस्सलपणाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या मूळ सनदेच्या शोधाची माहिती पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत नुकतीच देण्यात आली. या मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनीही या सनदेच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केल्या आहेत.
कौस्तुभ कस्तुरे, शिवराम कार्लेकर आणि लंडन येथील संकेत कुलकर्णी या इतिहास अभ्यासकांनी नव्याने प्रकाशात आणलेल्या शिवकालीन मूळ पत्रांचे चित्र पुण्यात प्रसिद्ध केले. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतली या पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्राने बनवलेली मूळ प्रत उजेडात आणल्याचा या अभ्यासकांचा दावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ रोजी समर्थ रामदासांना इनाम दिलेल्या गावांची माहिती यात आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष भावे यांनी सांगितले, “मंडळात एखादे पत्र वाचले म्हणजे त्यास मंडळाची मान्यता आहे, असे नसते. संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीच पाक्षिक सभा असते. त्यामुळे मंडळात सनद वाचली म्हणजे त्याच्या अस्सलपणावर शिक्कामोर्तब झाले असे नाही.” मुळात एक लक्षात घ्यायला हवे, की शिवकाळात कोणत्याही सनदेच्या चार अस्सल प्रती तयार केल्या जात. ज्याला इनाम दिले गेले आहे त्याच्याकडे एक प्रत, संबंधित गावाच्या पाटील व देशमुख यांच्याकडे प्रत्येकी एक प्रत आणि सरकारच्या दप्तरात एक प्रत. कोणत्याही सनदेच्या अशा चार अस्सल प्रती केल्या जायच्या. समर्थ रामदासांना इनाम दिलेल्या चाफळसंदर्भातली अस्सल मूळ सनद अद्याप उपलब्ध झालेली नाही. गजानन मेहेंदळे यांच्या मते, शिवाजी महाराजांच्या पत्रात तारीख, राज्याभिषेक शक, वार आदी तपशील पत्राच्या प्रारंभी मायन्यात असतो. नव्याने उजेडात आलेल्या पत्रात तो शेवटी आहे. शिवाय यात वाराचाही उल्लेख नाही. ही पद्धत शिवाजी महाराजांच्या पत्र लेखनपद्धतीस अनुसरून नाही. पत्रातली भाषादेखील शिवाजी महाराजांच्या पत्रातल्या भाषेशी जुळणारी नाही. ब्रिटिश लायब्ररीत आढळून आलेल्या सनदेतील मोर्तब (शिक्का) शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रातील मोर्तबाशी जुळत नाही, असाही आक्षेप मेहेंदळे यांनी नोंदवला आहे. ब्रिटिश लायब्ररीत आढळलेल्या सनदेतील अक्षर शिवकालीन दरबारी बाळाजी आवजी चिटणीस यांच्या हस्ताक्षराशी जुळत असल्याची बाबही तथ्यहीन असल्याचे मत मेहेंदळे यांनी नोंदवले आहे.
रामदासांचे कथित गुरुपद
“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांबद्दल आदरभाव असल्याचे पुरावे अनेक कागदपत्रांमधून उपलब्ध आहेत. मात्र, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, या दाव्याचे समर्थन करणारा विश्वसनीय पुरावा नाही. ज्या कागदपत्रांवरून काही जणांना असे वाटते, ती कागदपत्रे बनावट आहेत किंवा विश्वसनीय नाहीत.”
- गजानन भास्कर मेहेंदळे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ
पुढील स्लाइडवर वाचा, लंडनमधील सनदवरील आक्षेप कायम...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.