आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळे पंढरीच्या उंबरठ्यावर, आज दाखल होणार पालख्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांतून पंढरीच्या दिशेने येणारे पालखी सोहळे शनिवारी पंढरीनगरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वाखरी येथे विसावले आहेत.

 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. त्यापूर्वी वाखरी येथे रिंगण सोहळेही पार पडले. पंढरीच्या उंबरठ्यावर पालखी सोहळे आल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाच्या आेढीने सोहळ्यात सहभागी वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. विठूरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडमधील सर्व गाळे भरून पुढे गेलेली दिसत होती. दर्शनासाठी चौदा ते पंधरा तासांचा कालावधी लागत होता. यावर्षी मंदिर समितीच्या वतीने ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेड, संपूर्ण दर्शन रांगेच्या मार्गावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली आहे. पदस्पर्श दशर्न रांगेबरोबरच मुखदर्शन रांगेचेही चांगले नियोजन केले आहे. मंदिर परिसरासह चंद्रभागा वाळवंटात सुमारे १०० हून अधिक सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहेत.

 

आज दाखल होणार पालख्या
आषाढ शुद्ध दशमी म्हणजे रविवारी संध्याकाळी श्री संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल होणार आहेत. यात्रेसाठी येथे आलेल्या भाविकांमुळे ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपूर पत्राशेड, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, गजानन महाराज मठ आदी परिसर गर्दीने फुलून गेला आहे. विठ्ठल मंदिराशेजारील गल्ल्यांमधील मोठे वाडे, मठ, धर्मशाळांमध्ये वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले आहेत. त्यामुळे अवघी पंढरीनगरी भक्तिमय झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...