आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सवाई’त कौशिकी चक्रवर्तीच्या ‘मारुबिहाग’ची छाया; भुवनेश यांच्या ‘मुलतानी’लाही दाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- युवा गायिका  कौशिकी चक्रवर्ती यांनी गुरुवारी सादर केलेल्या  राग मारुबिहागची छाया  ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या  दुसऱ्या दिवसावर पसरून राहिली. पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांनी राग मुलतानीमधील  ‘बेगी आ रे साई’ या रचनेने ‘सवाई’च्या  दुसऱ्या सत्राचा  प्रारंभ केला.  त्याला जोडून द्रुत त्रितालात निबद्ध ‘दिल बेकरार’ ही पं. कुमार गंधर्व यांची बंदिश  पेश  करून ‘मुलतानी’चा माहौल उभा केला. सुरुवातीची नोमतोमयुक्त आलापी वेधक होती.   


मोजक्या  वेळात भुवनेश यांनी पाठोपाठ मांडलेला  राग ‘नंदकेदार’ दाद मिळवणारा ठरला. त्यातील  ‘लडे बिगडे’ ही रचना त्यांनी अतिशय नजाकतीने पेश केली.  गायनाची सांगता त्यांनी  त्यांचे पिताजी पं. मुकुल शिवपुत्र यांच्या  रचनेने केली.  माळवा प्रांतातील पारंपरिक लोकधूनवर आधारित ‘नीड घट बीच फाग मचैहो’ ही रचना  वेगळी वातावरणनिर्मिती करणारी ठरली.  त्यानंतर  स्वरमंचावर आलेल्या  कला रामनाथ यांनी व्हायोलीनवर  राग श्यामकल्याण  सादर केला.  ‘सवाई’मध्ये एक तपानंतर त्यांचे वादन सादर झाले. अलीकडे दुर्मिळ झालेला आलापीतील शांतपणा त्यांनी वादनात जपला होता, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 

 

त्यांच्या  वादनाला  पं. योगेश शम्सी यांनी केलेली तबल्याची  साथ अतिशय पूरक पण संयत होती.  रसिकांच्या आग्रहास्तव ‘झमकी झूकी आयी बदरिया  कारी’ या  रचनेची कजरीची धून सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. युवा पिढीतील लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन ऐकण्यासाठी  सवाईच्या  स्वरमंडपात उच्चांकी गर्दी झाली होती. पं. अजय चक्रवर्ती, पं. ज्ञानप्रकाश घोष, चंदना चक्रवर्ती अशा गुरूंकडून तालीम मिळालेल्या  कौशिकी यांनी गायनाची सुरुवात राग मारुबिहागने केली. ‘रतिया ...मितवा मै कैसे आऊ तोरे पास’ या बंदिशीच्या  शब्दांना अनुकूल अशा भावाभिव्यक्तीने त्यांचे सादरीकरण रंगले. बंदिशीतील  प्रत्येक शब्दाचा अर्थपूर्ण उच्चार, स्वरांचे लडिवाळ स्पर्श, सरगमचा मुक्त वापर, अतिद्रुत तानक्रिया ..यांनी युक्त  त्यांचे गायन ठरले.  फर्माईश केल्यावर ‘बागेश्री’ रागातील दोन रचना आणि ‘याद पिया की आये’ ठुमरी त्यांनी  पेश केली. 


‘महादेव शिवशंकर’  
पं. जसराज दुसऱ्या सत्राची सांगता करण्यासाठी स्वरमंचावर आले तेव्हा रसिकांनी टाळ्यांच्या  गजरात त्यांचे स्वागत केले.  जसराजजींनी ‘शंकरा’ रागातील ‘महादेव शिवशंकर’ ही शिवस्तुतीपर बंदिश सादर करत वातावरण भक्तिरसपूर्ण करून टाकले.  

बातम्या आणखी आहेत...