आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सवाई’ स्वरसोहळ्याला दिमाखात सुरुवात; दिग्गजांचे गायन; ध्रुपद अंगाच्या चतुरंगीवादनाने पूर्वार्ध रंगला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहनाईवरचे राग भीमपलासचे सूर आणि ‘चतुरंगी’वर छेडलेल्या  ‘मधुवंती’च्या  सुरांनी ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’चा बुधवारी  सुरेल प्रारंभ झाला. सुमारे दहा हजार रसिकांच्या उपस्थितीने सवाईचा स्वरमंडप गजबजला होता. वर्षानुवर्षे कलाकारांसाठी त्यांच्या  स्वरांचे तानपुरे घडवणाऱ्या  मिरजकर कुटुंबीयांनी  या वेळी  खास सजावटीच्या  तानपुऱ्यांच्या  चार जोड्या आर्य संगीत प्रसारक मंडळाला  भेट दिल्या.    


मधुकर धुमाळ  यांच्या  शहनाईवादनाने महोत्सवाची सुरुवात झाली. राग भीमपलासमध्ये  त्यांनी सुरेल काम केले. त्यानंतर  कजरी धून सादर करून वादनाची सांगता केली.  इंग्लंडमध्ये  वास्तव्यास असणाऱ्या  डॉ. विजय राजपूत यांनी राग पूरिया कल्याणमध्ये  ‘आज सो बन’, आणि ‘बहुत दिन बीते’ या रचना सादर केल्या. त्यानंतर  पिलू रागातील होरी  - ‘म्होरे कान्हा जो आये पलटके’ आणि  एक भजन त्यांनी सादर केले. पहिल्या दिवशी रसिकांच्या उत्सुकतेचा विषय असणरे देवाशिष भट्टाचार्य  यांचे चतुरंगीवादन वेगळ्या टोनल क्वालिटीमुळे रंगतदार ठरले.  सतार, सारंगी, सरोद आणि गिटार या  वाद्यांच्या  नादांचा एकत्रित अनुभव त्यांनी सादर केलेल्या  राग मधुवंतीच्या  वादनातून आला. पं.  ब्रिजमोहन काब्रा, पं. अजय चक्रवर्ती, उस्ताद अली अकबर खाँ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.   मूळ गिटार या वाद्यामध्ये  अनेक बदल करून भट्टाचार्य यांनी ‘चतुरंगी’ सिद्ध केली आहे. ६ मुख्य तारा, तरफेच्या बारा तारा, चिकारीच्या २ तारा जोडून त्यांनी  वेगळे नादसौंदर्य रसिकांना दाखवले. त्यांना  तबल्यावर  शुभाषिश भट्टाचार्य आणि  पखवाजावर अखिलेश गुंदेचा  यांनी दमदार साथ केली. या वेळी रसिकांची मोठी उपस्थिती होती .

 

पं. हरिप्रसाद चौरसियाच्या बासरीवादनाने सांगता

उत्तरार्धात बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायकद्वय  पं. राजन व पं. साजन मिश्रा यांनी  राग ‘पूरिया’मध्ये विलंबित एकतालात रचना सादर केल्या. त्रितालात निबद्ध  ‘मैं तो करी आई पियासंग रंगरलिया’, आणि  द्रुत एकतालात ‘पियासंग लागी लगन मोरी’ या रचना दाद घेऊन गेल्या. पहिल्या सत्राची सांगता पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या  बासरीवादनाने  झाली.

बातम्या आणखी आहेत...