आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पृथ्वीराजचे वय अवघे तेरा वर्षांचे आहे. ७० टक्के मतिमंद असल्याने तो विशेष व्यक्ती आहे. समोरच्या व्यक्तीशी तो संवाद साधू शकत नाही. त्याला लिहिता, वाचता येत नाही, तो कपडेही नीट घालू शकत नाही, डावे-उजवे, वर -खाली त्याला समजत नाही, पण हा मुलगा कानावर पडेल ते गाऊ शकतो. संगीताची त्याची समज पाहून त्याच्या आईवडिलांनी त्याला संगीत प्रशिक्षण देणे सुरू केले आणि पृथ्वीराजचा प्रवास आता स्वत:च्या अल्बमच्या प्रकाशनापर्यंत पोचला आहे. ‘आई, सांग ना मला..’ अशा शीर्षकाचा त्याचा पहिला अल्बम २८ मार्च रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर आणि अभिनेते रवींद्र मंकणी खास पृथ्वीराजचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
पृथ्वीराज हे सतीश व दया इंगळे यांचे अपत्य २३ मार्च २००४ रोजी ‘विल्यम्स सिंड्रोम’ हा दोष घेऊनच जन्माला आला. . जगात यावर कुठलेही औषध नाही. विविध प्रकारच्या थेरपी सातत्याने दिल्यास काही प्रमाणात स्वत:ची काही कामे करता येतात. पण कायमचे परावलंबित्व अपरिहार्य ठरते. वैद्यकीय तज्ज्ञांनी हे वास्तव आमच्यासमोर ठेवले, तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती. पण हिंमत न हारता आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला, असे दया इंगळे म्हणाल्या. ‘संगीत जाणणारे एक जण आम्ही घरी बोलावले आणि ते दर आठवड्याला तीन दिवस येऊन शास्त्रीय संगीतातील एक राग गात असत. पृथ्वीराज जवळच लोळत ते ऐकत असायचा. तीन वर्षांनंतर तो शब्दांऐवजी थेट गाऊ लागला.जोडीने त्याचा विशेष मुलांच्या शाळेत शैक्षणिक प्रवासही सुरू होता. सहा वर्षांचा होईतो पृथ्वीराज काही राग तसेच काही भजने म्हणू लागला होता. आठव्या वर्षी तो गांधर्व महाविद्यालयाची पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. पण लिहिणे, वाचणे येत नसल्याने तो पुढील परीक्षा देऊ शकला नाही. मात्र गायनात त्याने प्रगती सुरू ठेवली होती. तो चित्रपटगीतेही गाऊ लागला होता. अशा वेळी त्याला रंगमंचावर गाण्याची संधी मिळाली तर प्रोत्साहन मिळेल, उमेद येईल या विचाराने आम्ही प्रयत्न सुरू केले आणि हळूहळू पृथ्वीराज जाहीर कार्यक्रमांतून सहभागी होऊ लागला. आता अल्बमच्या निमित्ताने त्याचे गाणे अधिक रसिकांसमोर येईल, याचा आनंद वाटतो, अशी भावना दया इंगळे यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांत १३५ कार्यक्रम
पृथ्वीराजने तीन वर्षांत सुमारे १३५ कार्यक्रमांतून गाणी सादर केली आहेत. लोकांचे कौतुक, टाळ्या यामुळे त्याची प्रगती होत आहे. त्याची ग्रहणशक्ती वाढत आहे. शब्दोच्चार सुधारत आहेत आणि तालाची लयीची जाणीव पक्की होत आहे. त्याच्या या पहिल्या अल्बममध्ये तीन गाणी आहेत. विशेष मुलांच्या पालकांनाही पृथ्वीराजचे उदाहरण प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.
- दया व सतीश इंगळे, पालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.