आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबा पालखी सोहळ्याचे 5 जुलैला प्रस्थान, अधिक मासामुळे सोहळा उशिरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भाविकांच्या श्रद्धेचा विषय असणारा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यंदा पाच जुलै रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा ७ जुलै रोजी पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल होणार असून, संपूर्ण वारी मार्गावर फक्त पुण्यातच पालखी सोहळा दोन दिवस मुक्काम करणार   आहे. अन्य सर्व ठिकाणी पालखी सोहळ्याचा एकच मुक्काम असेल. पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी २२ जुलै रोजी पंढरपूर क्षेत्री पोहोचेल आणि २७ जुलै रोजी परतीचा प्रवास सुरू होईल.   


श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांनी येथे ही माहिती दिली. आळंदी येथून माउलींचा पालखी सोहळा ६ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे. त्यापूर्वी एक दिवस तुकोबांचा पालखी सोहळा देहू येथून मार्गस्थ होईल, असे मोरे म्हणाले. यंदा अधिक मास असल्याने पालखीचा सोहळा सुमारे एक आठवडा विलंबाने सुरू होणार आहे.  तसेच परतीच्या प्रवासातही तिथिवृद्धी असल्याने  एक मुक्काम वाढवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.    


तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३३३ वे वर्षे आहे. पाच जुलै रोजी पालखी सोहळ्याचे प्रस्थान परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे आणि पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाडा येथे होईल. ६ जुलै रोजी पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल. ७ जुलै रोजी तुकोबांचा आणि माउलींचा पालखी सोहळा एकत्रित स्वरुपात पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल होईल. विश्रांतीनंतर दोन्ही पालख्यांची वाटचाल हडपसरपर्यंत एकत्रित होऊन, माउलींचा पालखी सोहळा दिवे घाटाची चढण चढून सासवड मुक्कामी निघेल, तर तुकोबांचा पालखी सोहळा हडपसरमार्गे लोणी काळभोरच्या दिशेने वाटचाल करेल, असे मोरे म्हणाले.  दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी मार्गावर प्रशासनाकडून पोलिस संरक्षण, आरोग्य आणि सेवा- सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी या  वेळी सांगितले.

 

रिंगणे आणि धावा   
पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार, बेलवंडी येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर अकलूजनजीक माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल. याशिवाय पिराची कुरोली येथील मुक्कामाआधी तोंडले बोंडले (धावा) होईल. मार्गात एकूण सहा गोल व उभी रिंगणे होतील.  वारी मार्गावर पालखी सोहळ्याचे एकूण १६ मुक्काम होतील. पालखीदरम्यान अनेक स्वंयसेवी संस्था या वारकऱ्यांची मोठी सोय करत असतात.

बातम्या आणखी आहेत...