आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारवाड्यावरचा ‘आवाज बसला’, कार्यक्रमांना बंदी;सुरक्षेच्या दृष्टीने पुणे महापालिकेचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ब्रिटिशांना धारेवर धरणारी भाषणे जिथून झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे रणशिंग जिथून फुंकले गेले, आणीबाणीच्या विरोधात जिथून हुंकार उमटला यांसारख्या अनेक ऐतिहासिक सभांचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्यात यापुढे  खासगी कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. 


३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाडा परिसरात राजकीय-सामाजिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केला आहे.  या परिषदेत मेवाणी, खलीद यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याने राज्यातील सामाजिक शांतता व सलोखा धोक्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली. यासंदर्भात मेवाणी व खलीद यांच्याविरोधात अधिकृत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ अशा दाटीवाटीच्या नागरी वस्त्यांच्या मधोमध शनिवारवाडा आहे. येथून हाकेच्या अंतरावर उत्तरेला मुठा नदी  आणि त्या पलीकडे महापालिकेची मुख्य वास्तू आहे. अनेक दशकांपासून शनिवारवाड्याचे पटांगण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सभा, संमेलने, मेळावे, मैफली आदींसाठीचे लोकप्रिय स्थळ ठरले होते. मात्र, दशकभरात या परिसरात वाढलेल्या प्रचंड गर्दीमुळे या पटांगणातील कार्यक्रम अडचणीचे ठरू लागले आहेत. 

 

ऐतिहासिक संदर्भ 

- ब्रिटिशकालीन रे मार्केटचे  बांधकाम १८८६ मध्ये पूर्ण झाले. त्याआधी पुण्यातला मंडई-बाजार शनिवारवाड्याच्या पटांगणातच भरायचा.

- स्वा. सावरकर, कॉम्रेड डांगे, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी,  बाळासाहेब ठाकरे,  पु. ल. देशपांडे,  शरद पवार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदींनी आपल्या सभांनी शनिवारवाडा पटांगण गाजवले आहे.

 

सर्वसाधारण सभेपुढेच निर्णय व्हायला हवा
सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या कारणामुळे शनिवारवाडा पटांगणात जाहीर कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असे पत्र पोलिसांनी दिले आहे. त्याला अनुसरून आयुक्तांनी बंदीचे आदेश काढले. परंतु, हा निर्णय सर्वसाधारण सभेपुढे व्हायला हवा. शनिवारवाडा पटांगणातील कार्यक्रमासंदर्भातले यापूर्वीचे निर्णयही  सभेनेच घेतले आहेत.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे.

 

शासकीय व अधिकृत कार्यक्रमांसाठीच खुला  
शनिवारवाडा संरक्षित वास्तू आहे. या भागातच अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात कार्यक्रमांसाठी येणाऱ्यांची भर पडते.   वाहतूक कोंडी होते.  याचा विचार करता शनिवारवाडा पटांगण यापुढे महापालिकेचे अधिकृत व शासकीय कार्यक्रमांसाठीच उपलब्ध केले जाईल.
- आयुक्त, पुणे महापालिका.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पुणे महापालिकेने वृत्तपत्रात दिलेली जाहिरात....

बातम्या आणखी आहेत...