आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा मैदानेही जातील वारसास्थळांच्या यादीत : सचिन तेंडुलकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विद्यार्थी हा घटक केंद्रस्थानी ठेवून शिक्षण पद्धती आखली जावी आणि शाळांना क्रीडांगणे असावीत, ही सर्वसाधारण अपेक्षा असताना प्रचंड वेगाने आपल्याकडील शाळांची खेळाची मैदाने घटत आहेत. कित्येक शाळांना तर मैदानेच नाहीत. फक्त मजले आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करायला हवा, अन्यथा मैदानेही वारसास्थळांच्या यादीत ढकलली जातील, असा इशारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी पुण्यात दिला. 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग अँड फिट इंडिया राबवण्यात येणार अाहे. या मिशनचा प्रारंभ ख्यातकीर्त क्रिकेटपटू सचिन यांच्या हस्ते सोमवारी विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात झाला.  या वेळी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून सचिनने अस्खलित मराठी भाषेत जोरदार फटकेबाजी केली. 
खेळ आपल्याला काय देतो, असे वाटते? खेळाचे महत्त्व कशा प्रकारचे आहे? या थेट प्रश्नावर सचिन म्हणाला,‘खेळ तुम्हाला सर्वकाही देऊ शकतो, पण तो मनापासून, जिद्दीने खेळला पाहिजे. खेळ तंदुरुस्ती देतो, खिलाडूपणाची वृत्ती देतो, जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वाट्याला येणारी हार-जीत उमदेपणाने कशी स्वीकारावी हेही खेळ शिकवतो.

 

पण त्यासाठी आधी खेळाडू म्हणून आपण परिश्रम करायचे असतात. जिद्दीने, कष्टाने वाट चालायची असते. माझे स्वत:चे उदाहरणच मी देतो. मी खूप संघर्ष केला, परिश्रम तर प्रचंड केले, खेळावर मनापासून प्रेम केले, खेळासाठी वाट्टेल ते, ही भूमिका ठेवली. त्यामुळे शालेय शिक्षण बाजूला ठेवले. पण खेळावरची माझी निष्ठा अभंग राहिली म्हणूनच मी थोडेफार यश मिळवू शकलो.   

 

शॉर्टकट नकोतच    
 लहानपणी मला कुटुंबीयांचा पाठिंबा होता, पण सर्वसाधारण परिस्थितीमुळे खेळासाठी साधनसुविधांची वानवाच होती. पण मी हार मानली नाही, निराश झालो नाही, गुरूंवरची श्रद्धा कायम ठेवली. जिद्द, परिश्रम आणि खेळावरचे प्रेम यामुळे एका टप्प्यावर मला यश मिळालेच. नव्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता आहे. यशस्वी होण्यासाठीची पूर्वतयारी कमी पडते आहे. यशाला शॉर्टकट नसतात हे मुलांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे, असा कानमंत्र सचिन यांनी विद्यार्थ्यांना दिला.   

 

खेळ अभ्यासक्रमातला अनिवार्य विषय हवा   
आपल्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना आपण फक्त वर्ग, पुस्तके, शिक्षक, परीक्षा यात कोंडून ठेवतो. मुलांनी भरपूर तेही मैदानी खेळ खेळले पाहिजेत, असे मला वाटते. किंबहुना शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळ हा अनिवार्य विषय असला पाहिजे. उत्तम खेळणाऱ्यांना, राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले जातात. तसेच ते जिल्हास्तरावरील खेळाडूंनाही दिले जावेत. त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. खेळाप्रति उत्सुकता वाढेल, असेही ते म्हणाला.

 

३० धावा आणि चोवीस धावांचा किस्सा    
शाळेतील पहिल्या मॅचच्या वेळची आठवण सचिनने जागवली. ‘पेपरमध्ये नाव येण्यासाठी त्या वेळी ३० धावा काढाव्या लागत. माझ्या २४ धावा झाल्या होत्या. पण स्काेअर लिहिणाऱ्याने माझ्या  ३० धावा झाल्या असे लिहिले.  सरांनी मला किती धावा काढल्या? असे विचारल्यावर मी २४ धावा असे उत्तर दिले.  मी त्याला विरोध केला. पेपरमध्ये नाव येण्यासाठी स्काेअर लिहिणाऱ्याने तीस लिहिले असले तरी मी तसे करू दिले नाही.  नाव यावे असे वाटत असेल तर आधी तशी कामगिरी केली पाहिजे हे सरांनी सांगितले. त्यामुळे यशासाठी कुठलाही शॉर्टकट न पत्करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ‘क्रिकेट म्हणजे माझ्या अायुष्यातला अाॅक्सिजन अाहे, असे सांगताना सचिन या वेळी भावुक झाला होता. 

 

मैदाने हेरिटेज होऊ नयेत    

अापल्याकडील अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळांपासून वंचित राहतात. ज्या गतीने मैदाने कमी हाेत अाहेत त्याचा विचार करता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल, अशी खंत सचिन यांनी व्यक्त केली. दिवसातून एक तास तरी मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळले पाहिजेत. घाम गाळला पाहिजे. खेळ तुमच्यात अनेक सकारात्मक बदल घडवतो. ते पुस्तके घडवू शकत नाहीत.    

 

 

 

बातम्या आणखी आहेत...