आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा वारी प्लास्टिकमुक्त : प्रत्येक दिंडीला एक हजार पत्रावळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंढरीच्या वारीसाठी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्लास्टिक - थर्माकोल बंदीविषयी जागृती करण्याचा निर्धार आळंदी आणि देहू संस्थानांनी केला आहे. त्यासाठी कृतिशील पावले उचलण्यात येत असून, दोन्ही वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला संस्थानकडून एक हजार पत्रावळी आणि द्रोण देण्यात येणार आहेत. पत्रावळी वापरल्याने लाखोंच्या संख्येने होणारा प्लास्टिक व थर्माकोलच्या ताट-वाट्या-चमच्यांचा कचरा राेखता येईल. अशा रीतीने यंदापासून पंढरीची वारी प्लास्टिक - थर्माकोलमुक्त करण्याचा निर्धार दोन्ही संस्थानांच्या वतीने करण्यात आला आहे. 


श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले,'शासनाने प्लास्टिक - थर्माकोल बंदी जारी केली आहे. वारीदरम्यान दरवर्षी वारकरी प्लास्टिक व थर्माकोलचा मोठा वापर करतात. विशेषत: प्लास्टिक-थर्माकोलचा सर्वाधिक वापर रोजच्या जेवणासाठी होतो, हे लक्षात घेऊन संस्थानने प्रत्येक दिंडीला रोज एक हजार पत्रावळी व द्रोण पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मुक्कामांच्या जागा, न्याहारीच्या व भोजनाच्या जागांवर पत्रावळी, द्रोण तसेच धातूची भांडी-ताटे-वाट्या यांची शक्य तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यातून वारी प्लास्टिक-थर्माकोल फ्री करण्याचा आमचा प्रयत्न असेल.' संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे प्रमुख विश्वस्त अभिजित मोरे म्हणाले,'तुकोबांच्या वारीदरम्यान पत्रावळींचा वापर दोन वर्षांपूर्वीपासून सुरू केला. अनेक दिंड्या प्लास्टिक-थर्माकोल न वापरता स्टीलची भांडी-ताटे आणि पत्रावळींचा वापर करत आहेत. यंदापासून हा उपक्रम प्रभावीपणे राबवणार आहोत. 


तुकोबांच्या पालखीरथावर नवे कॅमेरे 
संत तुकाराम महाराजांच्या वारीतील पालखी रथावर यंदा अधिक क्षमतेचे चार नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा बदल केला आहे. हाय डेफिनेशन कॅमेरे असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेणे सुलभ होणार आहे, असे अभिजित मोरे म्हणाले. 


तुकोबांची वारी : दिंड्यांची संख्या ३३१ प्रस्थान : ५ जुलै राेजी देहू येथून 
माउलींची वारी : दिंड्यांची संख्या ४५० प्रस्थान : सहा जुलै रोजी अाळंदीतून 


वारकऱ्यांना रेनकोट देण्याचे आवाहन 
यंदा अधिक मास असल्याने वारीचे वेळापत्रक पुढे गेले आहे. त्यामुळे वारीचे अधिकाधिक दिवस पावसाचे असण्याची शक्यता आहे. वारीतील भाविकांना पावसापासून सुरक्षा मिळावी यासाठी रेनकोट देण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. रेनकोटवर बंदी नसल्याचे दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...