आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार प्रतिगामी नाहीत- प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचे प्रथमच संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आगामी निवडणूक आम्ही वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली निवडणूक लढवणार आहे. पुरोगामी विचारांच्या पक्षांनी आमच्यासोबत यावे, कारण आमचे दरवाजे मोकळे आहेत. मात्र, आमच्या अटी मान्य असणाऱ्या पक्षासोबतच जाऊ. एकट्या पवारांसोबत जाणार नाही. मात्र, आम्ही शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही. पण त्यांनी काही पावले प्रतिगामी उचलली आहेत. पेशवाईला आमचा विरोधच आहे. पवारांनी पेशवाई पगडी नाकारली फुले पगडी स्वीकारली याचा आनंदच आहे, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केले. 

 

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील सूर पाहता ते काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्यासोबत प्रथमच संकेत दिले आहेत. पवारांवर टीका करतानाच समविचारी म्हणून त्यांच्यासोबतही आघाडी होऊ शकते असेच त्यांना यातून सांगायचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आंबेडकर म्हणाले, धनगर आणि भटक्या जमातींची वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणार आहोत. वंचित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. यापुढे ती मिळावी याकरिता वंचित समाजातील लोकांना उमेदवारी देणार आहोत. विविध छोट्या जाती-जमाती समुहाच्या विभक्तपणाचा फायदा इथल्या वेगळवेगळ्या घटकांनी आजपर्यंत घेतला आहे. हे थांबविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संविधान काय ते कळाले पाहिजे त्यासाठी ते सर्वांपर्यंत पोहचवणार असेही त्यांनी स्पष्ट केले. 


लोकसभेला राज्यभरातून धनगर समाजाला 2 जागा, माळी समाजाला 2 जागा, लहान ओबीसी जातीतील लोकांना 2 जागा आणि मुस्लिमांना 2 ठिकाणी उमेदवारी देईल त्या पक्षासोबत, आघाडीसोबत आम्ही जाऊ पण त्यातही तो पक्ष, आघाडी ही पुरोगामी विचारांची असावी, अशी अट असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

 

दरम्यान, शेतक-यांच्या समस्यांसाठी लवकरच शेतकरी परिषद आयोजित करणार आहे. शिक्षण क्षेत्रातही सुधारणा आवश्यक असून, चॉईस ऑफ एज्युकेशनच्या दृष्टीने या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...