आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुज्ञ नागरिकांनो, पुणे रिंगरोडसाठी नाव सुचवा, 10 हजार जिंका- राज्य सरकारची स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासासह शहातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या पुणे रिंग रोड (कनेक्टिव्हिटी हब) प्रकल्पाच्या नामकरण स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) करण्यात आले आहे.

 

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याचा वेगाने विकास होत आहे. पुण्यामध्ये माहिती-तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल आणि शैक्षणिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे देशभरातील नागरिक विविध संधींच्या शोधात पुण्यात येत असतात. शहराचा दिवसेंदिवस व्यापक विस्तार होत असला तरी शहरामधील पायाभूत सुविधांच्या वाढीस असलेली मर्यादा आणि वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

 

या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत पुणे रिंग रोड प्रकल्पाची अंमलबजावणी पीएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या रोडची लांबी 128.66 किमी व रुंदी 110 मीटर असून रोडच्या मध्यभागी एक मेट्रो मार्गही असेल. या मार्गाजवळील परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी 46 टाऊन प्लॅनिंग स्किम्स प्रस्तावित आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यथोचित नाव मिळण्यासाठी नामकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणाऱ्या नावांमधून पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक दृष्टिकोन प्रतित होणे अपेक्षित आहे.

 

या स्पर्धेतील सहभागासाठी ७ फेब्रुवारी २०१८ च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. या स्पर्धेतील विजेत्याला १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...