आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ अॅपद्वारे पुण्‍यातील तरूणीने जर्मनीतून घेतला घटस्फोट; न्यायालयात नवी यंत्रणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आधुनिक तंत्रस्नेही पिढीने व्हॉटसअप, स्काईप आदी तंत्रांनी परदेशात राहूनही परस्पर संमतीने कौटुंबिक नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याची उदाहरणे आहेत. मात्र, राज्य सरकारने विकसित केलेल्या व्हिडिओ अॅपच्या माध्यमातून पुण्यातील कोथरूड परिसरातील तरुणीने जर्मनीत असलेल्या पतीशी घटस्फोट घेतला. या अॅपचा वापर अशा पद्धतीने पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

राज्य शासनाने कौटुंबिक न्यायालयासाठी विशेष व्हिडिओ अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून देशात किंवा विदेशांत कुठेही असलेल्या व्यक्तीशीकौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना संवाद साधणे शक्य होणार आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून परदेशातील व्यक्ती आता कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश तसेच समुपदेशकांशी संवाद साधू शकणार आहे. या अॅपचा प्रथमच वापर केल्याची माहिती शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातील सूत्रांनी दिली.

 

स्काईपचा वापर करून परदेशातून घटस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत. पण त्यासाठी परदेशातील व्यक्तीला तेथील न्यायालयात जावे लागणे अनिवार्य होते. नव्या अॅपच्या माध्यमातून असे करण्याची गरज नाही. न्यायाधीश व समुपदेशकांशी परदेशातील व्यक्ती थेट संवाद साधू शकते. प्रस्तुत खटल्यात नव्या अॅपची लिंक पतीला जर्मनीत पाठवण्यात आली. समुपदेशकांनी त्यांच्याशी संवाद साधला.त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश माधव काफरे यांनी संवाद साधला. परस्पर संमतीने या जोडप्याने घटस्फोट घेतला.

 

न्यायालयातच स्क्रीन लावण्यात येणार
तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना सध्या न्यायालयातील व्हिडिओ कक्षात जाऊन पक्षकारांशी संवाद साधावा लागतो. लवकरच कौटुंबिक न्यायालयातील कक्षात स्क्रीन्स बसविण्यात येणार आहेत. न्यायालयाचे काम सुरू असतानाच पुढची सुनावणी कोणती, याची माहिती या स्क्रीनमुळे त्वरित समजेल. हरित न्यायाधिकरण, उच्च न्यायालयात अशी सुविधा आहे, अशी माहिती अॅड वैशाली चांदणे यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...