आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींचे अाज पुण्यात अांदाेलन; भाजपविराेधात करणार शक्तिप्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात दूध-उसाच्या आंदोलनाची हाक दिली अाहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या स्थानिक राजकारणात विशेषतः शेट्टींच्या स्वगृही कोल्हापूर जिल्ह्यातच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २९) पुण्यात होणारे आंदोलन शेट्टी यांनी प्रतिष्ठेचे केले आहे.  


गेल्या साखर हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचे १५४३  कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकवले आहेत. दुधाला सरकारने जाहीर केलेला २७ रुपये प्रति लिटर भाव दूध उत्पादकांना मिळत नाही. त्यामुळे थकीत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी तसेच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी शेट्टी यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. यासाठी साखर आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी पुण्यात यावे, असा शेट्टींचा प्रयत्न आहे. “गावाकडच्या शेतकरी भावासाठी, शेतकरी बापासाठी पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून मोर्चाला यावे,’ असे अावाहनही शेट्टींनी ‘व्हिडिओ क्लिप’द्वारे साेशल मीडियातून केले अाहे. सन २०११ मध्ये शेट्टी आणि तेव्हा त्यांच्यासोबत असणारे ‘स्वाभिमानी’चे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांनी याच पद्धतीने साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्यास जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यापेक्षा जास्त गर्दी जमवण्याचा शेट्टींचा प्रयत्न आहे. 


कारखानदार म्हणतात... संयम राखा  
राज्यातील ऊस उत्पादकांचे काही पैसे थकीत असले तरी शेतकऱ्यांनी सबुरी दाखवावी, असे आवाहन साखर कारखानदारांकडून केले जात आहे. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये प्रति किलो केल्यापासून साखरेच्या दर २०००- २२०० रुपये क्विंटलवरुन २९०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. याशिवाय केंद्राने ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचे जाहीर केला आहे. या चांगल्या निर्णयांचा परिणाम लवकरच दिसेल.


आगामी वर्षदेखील प्रचंड ऊस उत्पादनाचे आहे. त्यामुळे मोर्चे काढून वातावरण गढूळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन साखर धंद्यातल्या अडचणी लक्षात घ्याव्यात, असे राज्यातील साखर कारखानदारांचे म्हणणे आहे.  

 

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय  
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉल दरवाढीचा निर्णय झाला आहे. इथेनॉलचे वाढीव दर येत्या हंगामात म्हणजेच १ डिसेंबर २०१८ पासून लागू होतील. त्यानुसार मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४३.७० रुपये प्रतिलिटर दर मिळेल. शिवाय प्रथमच ऊस रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४७.४९ रुपये प्रति लिटर दर देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. हे निर्णय दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे आहेत. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ


सर्वपक्षीय नेते, मंत्र्यांनी थकवले पैसे  
सन २०१७-१८ च्या साखर हंगामात राज्यातल्या १८८ साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते. या पैकी ५० खासगी आणि ५४ सहकारी कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. सर्वपक्षीय नेते, आमदार, मंत्र्यांच्या ताब्यातील या साखर कारखान्यांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी एकूण १५४३ कोटी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत.  


शेतकऱ्यांना मिळाले २० हजार कोटी  
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांची स्थिती चांगली आहे. सन २०१७-१८ च्या हंगामात राज्यातल्या ऊस उत्पादकांना आतापर्यंत एकूण २०,२६५.३३ कोटी रुपये ऊस बिलापोटी मिळाले आहेत. एकूण ऊसबिलापोटी देय रकमेच्या जेमतेम ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. यातही राजू शेट्टी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बव्हंशी कारखान्यांनी उसाचे शंभर टक्के पैसे अदा केले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...