आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलबाबांनी ‘काँग्रेस बचाव मोर्चा’ काढावा, रामदास आठवलेंचा टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘राहुल गांधीजी..आपण संविधानाची चिंता करू नये. ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्याऐवजी ‘काँग्रेस बचाव’ मोर्चा तुम्ही काढावा. कारण येत्या काळात भाजपच्या नेतृत्वाखालील आमची आघाडी काँग्रेसला हद्दपार करणार आहे,’ असा इशारेवजा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी   रविवारी काँग्रेस अध्यक्षांना दिला. संविधानाच्या रक्षणासाठीच मी मंत्रिपद सांभाळत आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संविधानाला, अॅट्रॉसिटी कायद्याला आणि दलित आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी मी घेत आहे,’ असेही ते म्हणाले.  
रिपब्लिक पार्टी इंडियाच्या  राज्यव्यापी अधिवेशनात ते बाेलत हाेते. या वेळी सीमा आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपाइंचे राष्ट्रीय चिटणीस अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर आदी उपस्थित होते. या वेळी पँथर चळवळीवर आधारित ‘पँथर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.  


आठवले म्हणाले की, रिपाइं हा पक्ष कार्यकर्त्यांच्या फळीतून उभा आहे. मी नुसती भाषणे करून इथवर आलेलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. अनेक जण सोडून गेले; पण एक गेला आणि शंभर आले. समाजपरिवर्तनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करण्यासाठीच मी  नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. आमचा पक्ष केवळ दलितांचा नाही. ही ओळख बदलण्यासाठी आपण सर्वांनी नेटाने प्रयत्न करायला हवेत.’  
‘गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर गावागावातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले रामदास आठवले आमच्यासोबत असल्याचा आम्हाला आनंद आहे,’ असे गिरीश बापट म्हणाले. “सोशल मीडियातून कोणी कितीही खोटा प्रचार केला तरी आठवले यांचे नेतृत्व समाजाने स्वीकारले आहे.

 

कोरेगाव भीमाबाबतचे सत्य लवकरच बाहेर येईल आणि आठवले साहेबांचा करिष्मा आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल,’ असे दिलीप कांबळेंनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.   


...तर काळ्या पाण्याची शिक्षा  
रामदास आठवले यांनी नेहमीच्या शैलीत चारोळ्याही ऐकवल्या. ‘मजबूत करण्या नेशन, होत आहे येथे अधिवेशन, दलित विरोधकांना घालण्या वेसण, करीत आहे मी पुण्यात भाषण’ या त्यांच्या चारोळीला जोरदार प्रतिसाद मिळाला. एका कार्यकर्त्याला भाषणाची संधी न मिळाल्याने तो तावातावात निघून गेला. त्याला उद्देशून आठवले म्हणाले, “आता पक्ष विस्तारासाठी मी अंदमानला जातो आहे. त्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेसाठी तिकडे पाठवेन.’ त्यावर हशा पिकला.

 

आठवले संपत नसतो  
“संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास मी मंत्रिपद सोडून देईन. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर ‘रामदास आठवले संपला,’ असा प्रचार केला गेला. पण आठवले संपणारा नाही, तर संपविणारा आहे. हा प्रचार म्हणजे खोडसाळपणा आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे यांच्याबाबत समाजात संशयाची भावना आहे. त्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे,’ असे आठवले म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...