आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, तुकोबारायांची पालखी आज पुण्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या वैभवी पालखी सोहळ्याने शुक्रवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास अलंकापुरीतून (आळंदी) पंढरीकडे प्रस्थान ठेवले. हजारो वैष्णवांच्या डोळ्यात या वेळी आनंदाश्रू तरळत होते. श्री विठ्ठल-विठ्ठल, ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम व हरिनामाच्या जयघोषाने अलंकापुरी निनादून निघाली होती. वीणा, टाळ-मृदंगाचा गजर, पावसाच्या सरी आणि ऊन-सावलीच्या खेळामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. 


परंपरेप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यातील धार्मिक विधी पहाटे घंटानादात सुरू झाले. विधिवत पूजेनंतर माउलींच्या पादुका मंत्रोच्चाराच्या घोषात फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजित करण्यात आल्या. आळंदीच्या ग्रामस्थांनी माउलींची पालखी खांद्यावर घेत मुख्य वीणा मंडपातून मंदिर प्रदक्षिणा केली. पालखी मंदिरातील प्रदक्षिणा आटोपून पालखी सायंकाळी सात वाजता महाद्वारातून बाहेर पडली. तेव्हा हजारो वैष्णवांनी एकच जल्लोष केला. माउली पालखीची नगरप्रदक्षिणा सुरू असताना पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. तत्पूर्वी पालखी प्रस्थानासाठी दुपारी एक वाजता माउलींचे दर्शन बंद करण्यात आले. मंदिरात जमा झालेल्या दिंड्यांनी वीणा-टाळ-मृदंगाचा गजर चालू केला. वारकऱ्यांचे सांप्रदायिक खेळ या वेळी रंगू लागले. माउलींच्या अश्वाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली हाेती. आळंदीची ग्रामप्रदक्षिणा आटोपून माउलींचा वैभवी पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी आळंदीतल्या जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी रात्री साडेआठच्या सुमारास पोहोचला. माउलींची पालखी शनिवारी (दि.७) सकाळी सहाचे सुमारास पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. दरम्यान, यंदा अधिक मास आल्याने पालखी सोहळा महिनाभर पुढे गेला आहे. 


तुकोबारायांची पालखी आज पुण्यात 
गुरुवारी देहूतून पंढरीला प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात स्वागत झाले, निगडी येथे पालखीचे आगमन होताच त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली होती. पालखीचा मुक्काम आज आकुर्डीत असून शनिवारी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, देहूतल्या इनामदार वाड्यातून सकाळी पालखीने प्रस्थान ठेवले. त्यानंतर अनगडशहाबाबा दर्गा येथे पहिली अभंगआरती झाली. चिंचोली पादुका येथे दुसरी अभंगआरती झाली. देहुकरांचा निरोप घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास निगडीतल्या भक्ती-शक्ती चौकात पालखीचे आगमन झाले. नंतर आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात विसावली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आळंदी येथील पुजेचा व्हिडिओ आणि फोटोज...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...